✍ लेख : “सत्ता आरोहण भाजपाचे” -विवेक देशपांडे …

577

वणी नगरपालिकेत भाजपचे दिमाखदार सत्ता आरोहण

विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात विकासाच्या नव्या दिशेने पाऊल; नेत्यांच्या प्रेरणादायी भाषणांनी सोहळा गाजला !


वणी । १३ जानेवारी, २०२६ :दि. २१ डिसेंबरला घोषित झालेल्या नगरपालिकेच्या निकालानंतर दि. १२ जानेवारीला भाजपने हस्तगत केलेल्या वणी नगरपालिकेवर लोकनिर्वाचित नगराध्यक्षासह उपाध्यक्ष व स्वीकृत नगरसेवकांची निवड करून कार्यभार स्वीकारला. मागील टर्ममध्ये भाजपाचीच वणी पालिकेवर सत्ता होती व त्यानंतर चार वर्षे प्रशासकाकडे कार्यभार होता. सुमारे चार वर्षे प्रशासकाकडे कारभार असतानाही पुनश्च सत्ता हस्तगत करणे हे खरोखरच लक्षणीय यशच म्हणावे लागेल. आणि त्यात मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असतानाही. त्यामुळे पदग्रहण सोहळा दैदीप्यमान व्हावा ही कार्यकर्त्यांची भावना होती ती स्वाभाविकच म्हणावी लागेल आणि तो तसा झालाही.

स्वामी विवेकानंदराजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून हा दिमाखदार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात “महिला शक्तीचा सन्मान” करून भाजपने आपल्या वेगळ्या शैलीचा परिचय दिला हे निश्चितच अभिनंदनीय आहे.

संपूर्ण कार्यक्रमात झालेली नेत्यांची भाषणे ही एकापेक्षा एक सरस होती. मा.नगराध्यक्षा विद्याताई आत्राम यांचे भाषण त्यांच्या भावी वाटचालीचे प्रतिबिंब होते. नगराच्या विकासात केवळ पदाधिकारीच नव्हे तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा उल्लेख करून दाद देऊन गेला. विद्याताई या उत्तम गृहिणी तथा उत्तम शिक्षिका आहेत. त्या ज्या शाळेत अध्यापनाचे कार्य करतात त्या शाळेचे नाव “आदर्श’ आहे त्यामुळे त्यांची कारकीर्दही आदर्शच असेल अशी आशा करावयास हरकत नाही. “विद्याताई, आपण मातृवत्सल आहातच पण प्रसंगी राणी लक्ष्मीबाई सारख्या रणरागिणीही व्हाल. समस्यांचा निपटारा करताना आपल्याला प्रसंगी रणरागिणी बनून प्रशासनाकडून कामे करवून घ्यावी लागतील व विविध विषयांच्या बैठकांमध्ये ‘हेडमास्तरही’ व्हावे लागेल.”नगराध्यक्ष पद खरे तर मोठी जबाबदारी. याप्रसंगी मला भारतरत्न श्रद्धेय अटलजी पंतप्रधान असतानाचा प्रसंग आठवतो. प्रसंग असा की, एकदा अटलजी म्हणाले होते की लालकृष्णजी अडवाणी आणि प्रमोदजी महाजन हे माझे लक्ष्मण आहेत. त्यावेळी हर्षभरित होऊन प्रमोदजींच्या कन्या पूनम महाजन प्रमोदजींना फोन करून म्हणाल्या की बाबा, तुम्हाला अटलजींनी त्यांच्या लक्ष्मणाची उपमा दिली. बाबा मला तुमचा अभिमान वाटतो. त्यावर प्रमोदजींनी कन्येला दिलेले उत्तर फार सुंदर होते ते म्हणाले, “बेटा, मोठेपणा, मोठी जबाबदारी, मोठ्या अपेक्षा हे तूही लक्षात असू दे”.

विद्याताई आपण वणीच्या नगराध्यक्षा म्हणून निर्वाचित झाल्या आहात त्यामुळे आपणास मोठेपणा तर मिळणारच आहे पण त्याचवेळी आपणाकडून अपेक्षाही मोठ्याच राहणार आहेत. आगामी पाच वर्षे आपणास रात्रंदिवस एक युद्धाचा प्रसंग अशीच राहणार आहे. आपण या कसोटीवर खऱ्या उतराल ही आशा आहे.

मी ज्योतिषी नाही पण तुम्हाला एक सांगतो, भविष्यात एक मोठे पद तुमची वाट पाहत आहे. “NO POWER ON EARTH CAN STOP AN IDEA WHOSE TIME HAS COME”. पण त्यासाठी तुम्हाला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवावा लागेल. So Give Your 100% Best. आपल्या कारकिर्दीस मनःपूर्वक शुभेच्छा.पदग्रहण सोहळ्यातील सुंदर भाषण म्हणजे माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचे भाषण. त्यांनी सांगितलेला तो रांगणा भुरकी घाटावरचा डोहाच्या खोली मोजण्याचा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. तेरा उद्याने व रस्त्यांच्या उत्तम सुविधा ही त्यांच्याच कारकिर्दीतील देण आहे. खऱ्या अर्थाने विकासाचा पाया रचणारे नगराध्यक्ष असा उल्लेख त्यांचा नेहमीच करावा लागेल.

अत्यंत समयोचित आणि कृतार्थ भावनेचा मेळ असणारे भाषण म्हणजे माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे भाषण. आता पर्यंत त्यांच्या ऐकलेल्या भाषणांमध्ये सर्वोत्कृष्ट भाषण असाच या भाषणाचा उल्लेख करावा लागेल. कमीतकमी वेळात काय बोलू आणि किती बोलू असं या माणसाला झालं होतं. काही नतद्रष्ट स्वपक्षाच्या लोकांमुळे जिव्हारी लागलेला पराभव पचवून हा माणूस झपाटल्यागत नगर परिषद निवडणुकीत उभा ठाकला. वणीकरही याच्या पाठीशी उभे राहिले आणि या पठ्ठ्याने विजय खेचून आणला. वणीकरांना विकासाचे व्हिजनही काल याने दिले. निश्चितच हा माणूस आपला शब्दही पाळेल अशी मलाच नव्हे तर समस्त वणीकरांना खात्री आहे.

सामाजिक न्याय मंत्री अशोकराव उईके यांचे भाषणही छान वाटले. महिला सुरक्षा व महिला सबलीकरण या विषयी त्यांचे विचार सुंदर होते. वणीच्या विकासात “देवाभाऊंचे सरकार” पैसा कमी पडू देणार नाही हे त्यांनी दिलेले अभिवचन निश्चित पूर्ण होईल अशी आशा करूया.

निवडणुकीपासून सत्तारोहणापर्यंत मला आवडलेली निःस्पृह आणि जबरदस्त चिकाटी दाखवणारी भूमिका वठवणारे वणीचे भाजपा शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी. कालच्या कार्यक्रमात सगळीकडे असून सुद्धा कॅमेऱ्यासमोर न दिसणारे निलेशजी निश्चितच आदरास पात्र ठरतात. मा. नगराध्यक्षांच्या पदग्रहणावेळी खुर्ची हलू नये व विद्याताईंना बसताना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी मागून धरून ठेवलेली खुर्ची हा प्रसंग त्यांच्याविषयी आदर वाढवतो. पक्षात शहराचा सर्वोच्च पदाधिकारी जेव्हा भगिनीचा पाठीराखा बनतो त्या पक्षाचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल असते. निलेशजी, आपण लांब रेसचा घोडा आहात त्यामुळे जरा तब्येतीची काळजी घ्या. निवडणुकीच्या धामधुमीत आपणास बीपीची गोळी घ्यावी लागली असे कानावर आले, जरा काळजी घ्या. आपल्यासारखे कार्यकर्ते आमच्या वणीची संपत्ती आहे, जरा तब्यतीला जपा. कामाचा ताण घालवण्यासाठी काही वेळ कुटुंबात रमा, कधी वेळ काढून आवडीचा चित्रपट बघा, गायनाचा छंद असेल तर गायन करा त्याने ताण हलका होईल. राजकारण्याने कुटुंबाशी कनेक्ट कसे राहावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले बोदकुरवार साहेब, कधी या विषयावर त्यांच्याशी चर्चा करून बघा.

निवडणुकी नंतर सर्वात महत्त्वाची कोणत्या गोष्टीची चर्चा गावात होत होती ती म्हणजे “उपाध्यक्ष कोण होणार?” व “स्वीकृत नगरसेवक कोण होणार?” काल या दोन्हीही चर्चांना पूर्णविराम मिळाला. निवड झालेला उपाध्यक्ष हा मी ज्या प्रभागात येतो त्या प्रभागाचा झाल्यामुळे मला विशेष आनंद. तसेच बीजेपीसाठी सर्वात चॅलेंजिंग सीट कोणती होती ती प्रभाग चारमधील राकेश बुगेवारांची सीट. ही सीट निघणे म्हणजे फार मोठीच उपलब्धी. यासाठी प्रा. खाडें सारख्या अनामी वीरांचे योगदान. उपाध्यक्ष पद हे अडीच-अडीच वर्षांसाठी विभागून देण्यात आले आहे हे काही पोर्टलवरील बातम्यातून कळले. सत्तेचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल चांगले आहे.सर्वांत मोठी उत्सुकता मला लागली होती ती म्हणजे स्वीकृत नगरसेवक कोण राहतील याची. तीही काल पूर्ण झाली. पक्षाच्या कामात तसेच शहर विकासासाठी ज्यांनी विशेष योगदान दिले आहे अशांची निवड या पदाकरिता पक्ष करत असेल असा माझा समज आहे. त्यामुळे हे आता नगरपरिषदेत शहर विकासासाठी विशेष योगदान देतील अशी आपण आशा करूया.

शेवटी आपणा सर्वांना शुभेच्छा…

  • विवेक देशपांडे, वणी.
  • दि. : १३/०१/२०२६

www.WaniSamachar.com