♦️ “जिल्हा परिषद” व “पंचायत समिती” निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर: पुण्यासह १२ जिल्ह्यांत मतदान ५ फेब्रुवारीला !

696

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर !

▪︎पुण्यासह १२ जिल्ह्यांत मतदान ५ फेब्रुवारीला !


मुंबई । दि. १३ जानेवारी २०२६ :

राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दुपारी सह्याद्री अतिथिगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ फेब्रुवारी पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याचे बंधन असल्याने, आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम आजच जाहीर करण्यात आला आहे.

● निवडणूक कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे:

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे: १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
  • नामनिर्देशन पत्रांची छाननी: २२ जानेवारी
  • उमेदवारी माघारीची अंतिम मुदत: २७ जानेवारी
  • अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप: २७ जानेवारी दुपारी साडेतीन नंतर
  • मतदान: ५ फेब्रुवारी २०२६
  • मतमोजणी व निकाल: ७ फेब्रुवारी २०२६ सकाळी १० वाजल्यापासून

प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याची सुविधा राहणार आहे – एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि दुसरे पंचायत समितीसाठी. नामनिर्देशन प्रक्रिया ऑफलाइन राहणार असून, महापालिका निवडणुकी प्रमाणेच जातवैधता पडताळणी आवश्यक असेल. उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असून, उमेदवारी अर्जासोबत जातपडताळणी समितीकडे अर्ज दाखल केल्याची सत्यप्रत सादर करता येईल. निवडून आल्यावर ६ महिन्यांच्या आत जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असेल; अन्यथा निवड रद्द होईल.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात खालील १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांचा समावेश आहे:

  • पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर
  • रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  • छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर

निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांतील निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जातील.”

या घोषणेमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे.

(बातमी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषद आणि जाहीर कार्यक्रमावर आधारित)


www.WaniSamachar.com