वणी नगरपरिषद निवडणूक २०२५ : दुसर्‍यांदा भाजपची एकहाती सत्ता, संजीवरेड्डी बोदकुरवार ठरले खरे ‘किंगमेकर’ !

298
● वणी न.प. निवडणूक – २०२५ ●

दुसर्‍यांदा भाजपची एकहाती सत्ता, संजीवरेड्डी बोदकुरवार ठरले खरे ‘किंगमेकर’ !

▪︎मोलाची आणि विश्वासाची साथ लाभली ती म्हणजे वणी शहर भाजपा अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांची.


वणी । दि. २४ (विशेष प्रतिनिधी):

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता काबीज केली आहे. एकूण २९ नगरसेवकांच्या जागांपैकी भाजपने १८ जागा जिंकल्या, तसेच नगराध्यक्ष पदही त्यांच्या ताब्यात आले.या विजयाने माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढला असून, ते या निवडणुकीचे खरे ‘किंगमेकर’ ठरले आहेत. वणीकर जनतेचा भाजप आणि बोदकुरवारांच्या नेतृत्वावरचा विश्वास पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाचे उमेदवार संजय देरकर यांनी बोदकुरवारांना पराभूत केले होते. मात्र, नगरपरिषद निवडणुकीत बोदकुरवारांनी देरकरांच्या पक्षाला धूळ चारत त्यांचा प्रभाव कमी केला. भाजपने १८ नगरसेवक व १ नगराध्यक्ष जागा जिंकल्या असून, विरोधी महाविकास आघाडीला केवळ मूठभर जागांवर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसला फक्त तीन जागा मिळाल्या, तर शिवसेनेला (उद्धव गट) सहा जागांवर रोखावे लागले, आणी शिवसेना (शिंदे) पक्षा, आप, व.ब.आ., रा.कॉ.श.प, MIM यांना तर खातेही उघडता आले नाही. या निकालाने विरोधकांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या निवडणुकीत बोदकुरवारांना मोलाची आणि विश्वासाची साथ लाभली ती म्हणजे वणी शहर भाजपा अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी आणि त्यांच्या टीमची. बोदकुरवारांच्या नेतृत्वात ॲड. चौधरी यांनी वणी शहरात शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध अशी प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. निवडणूक जाहीर होताच प्रभागनिहाय प्रभारी आणि सहप्रभारी नेमण्यापासून सुरुवात झाली. बोदकुरवारांनी प्रत्येक प्रभागात स्थानिक लोकांशी चर्चा घडवून आणली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांची मते ऐकली. त्यानंतर इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारून मुलाखती घेण्यात आल्या. सर्व पक्षांपूर्वीच भाजपने योग्य उमेदवारांची यादी जाहीर केली, ज्यामुळे प्रचाराला वेग आला.

नियोजनबद्ध प्रचारतंत्र हे या विजयाचे मुख्य कारण ठरले. बोदकुरवारांच्या लोकप्रियतेचा पूर्ण उपयोग करत ‘एक दिवस एक प्रभाग’ या सूत्रानुसार सर्व प्रभागांत डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. चौकाचौकात कॉर्नर सभा घेण्यात आल्या, तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची जंगी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. या सभेने मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. बाकी सर्व प्रतिस्पर्धी पक्षांना असे नियोजनबद्ध प्रचार करणे जमले नाही, ज्यामुळे ते मागे पडले.विशेष म्हणजे, या निवडणुकीत भाजपमध्ये गटातटाचे राजकारण दिसले नाही. सर्व प्रमुख स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकदिलाने प्रचार करताना दिसले. बोदकुरवारांच्या रणनीतीमुळे आघाडीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.

प्रभाग पाच मधील भाजपच्या मोनाली निमकर यांनी सर्वाधिक १,०३८ मतांच्या फरकाने विजय मिळवला, तर प्रभाग १४ अ मधील भाजपचेच उमेदवार सौ.गव्हाणे केवळ तीन मतांनी जिंकल्या. अपक्ष उमेदवार धनराज भोयले पाचव्यांदा नगरसेवक झाले, तर भाजपचे राकेश बुग्गेवार आणि आरती वंढरे दुसऱ्यांदा निवडून आल्या.

या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे भाजपला दुसऱ्यांदा वणीकर जनतेने एकहाती सत्ता सोपवली. केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता असल्याने शहर विकासासाठी अधिक निधी मिळेल, या अपेक्षेने मतदारांनी भाजपला कौल दिला. या विजयाने बोदकुरवारांनी आपली राजकीय ताकद पुन्हा सिद्ध केली असून, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी हा एक संदेश ठरेल.

“वणी नगरपरिषदेत आता विकासाच्या नव्या अध्यायाची सुरुवात होणार आहे”, असे स्थानिक मतदारांचे म्हणणे आहे.


www.WaniSamachar.com