✍: “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील…”

556

“असू आम्ही सुखाने पत्थर पायातील…”


  • वणी । २९ डिसेंबर २०२५ :

दि. २८ डिसेंबर च्या तरुण भारत वृत्तपत्रामधे आलेल्या एका बातमीने मन भूतकाळात गेले. ती बातमी अशी होती की धामणगाव येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा डॉ अर्चना अडसड रोठे यांनी विजयाचा कुठलाही सत्कार न स्वीकारता शहरातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिकांचा त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. ही ज्येष्ठ मंडळी कोण तर आणीबाणी काळात ज्यांनी संघर्ष केला व पक्षाचे कठीण काळात संघर्ष केला ते लोक.

तत्कालीन पंतप्रधान इंदिराजी गांधी यांची निवड अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द ठरविली म्हणून इंदिराजींनी देशात आणिबाणी लावली होती. नागरिकांचे सर्व अधिकार गोठवून सर्व सरकारी संस्थांचा गैरवापर करणे सुरु केले होते. वृत्तपत्र स्वातंत्र्यवरही गदा आणली गेली होती, प्रचंड दडपशाही करण्यात येत होती. विरोधकांना तुरुंगात टाकले होते.

मला आजही ते दिवस आठवतात कारण माझे वडील व काका यांना सुद्धा अटक करण्यात येऊन तुरुंगात टाकण्यात आले होते. अशी अनेक संघविचारांच्या मंडळींना तुरुंगात टकण्यात आले होते.

अशा दडपशाही विरोधात संघविचारांच्या मंडळींनी जोरदार संघर्ष केला. काहींनी सत्याग्रह केला तर काहींना मिसा कायद्या अंतर्गत अटक करण्यात आली होती.

ही सर्व मंडळी कोण होती तर समाजातली सामान्य माणसेच होती पण राष्ट्रभक्तीने प्रेरित झालेली होती.या देशातील ना गरिकांच्या मूलभूत हक्कावर आणल्या गेलेल्या गदेविरुद्ध ही माणसे पेटून उठली होती. सर्वसामान्य कुटुंबातील ही मंडळी सर्वस्वाचा होम करीत होती. त्यांच्या कुटुंबियांचे अतोनात हाल होत होते. हे सर्व हालअपेष्टा सहन करणारे पुरवा श्रमीच्या जनसंघाच्या म्हणजेच आताच्या भारतीय जनता पक्षाचे पर्यायाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे कार्यकर्ते होते. या लोकांनी खस्ता खाल्ल्या म्हणून आज भाजपाला चांगले दिवस आलेत.
एखाद्या कुटुंबातील पुरुषाच्या पुण्याईने पुढील पिढ्या सुखाने जगतात अगदी तसेच ही पूर्वीची कार्यकर्ता मंडळी खपली म्हणून आजचा सुवर्णकाळ दिसतो आहे.

मा. अर्चनाताईंनी हे सर्व जाणून स्व चा विचार सोडून या महानुभावांचा त्यांचे घरी जाऊन सत्कार केला त्यासाठी त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. तसा अर्चनाताईना स्व. मा. दादाराव अडसड व मा.अरुणभाऊंचा वारसा मिळालाच आहे त्यामुळेच त्यांनी ही समयसूचकता दाखविली.
या लोकांनी स्वतः चा विचार नं करता राष्ट्राचा विचार केला, पुढील वाटचालीत कधीही फळाची अपेक्षा केली नाही म्हणजेच खऱ्या अर्थाने “असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभारणे हेच आमुचे शील” ही उक्ती सार्थ ठरविली त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अर्चनाताईंचा हा उपक्रम निश्चितच प्रशन्सनीय ठरतो.

पुढील पिढ्यांनी मागील पिढ्यानं विषयी कृतज्ञता व्यक्त करावयासच पाहिजे हीच आपली संस्कृती आहे व त्याचेच पालन अर्चनाताईंनी केले आहे त्यासाठीच त्या इतरांसाठी प्रेरणादायी ठरतात. या महतकार्यासाठी अर्चनाताईना खूप खप धन्यवाद आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏


www.WaniSamachar.com