

घायाळ ‘खामेनेई’ अधिक घातक..!
वणी । २६ मार्च २०२६ । ✍ विवेक देशपांडे :

सत्तेची धुंदी आणि संतापाचा उद्रेक या दोन मानसिक अवस्थांचे रसायन फार घातक असते. भारताने हे अनुभवले आहे. विभाजनानंतर भारतात झालेली सर्वाधिक भयानक दंगल होती – दिल्लीची. १९८४ मध्ये इंदिरा गांधींची हत्या झाली, राजीव गांधी पंतप्रधान झाले. नव्याने मिळालेली सत्ता व आईच्या हत्येचा स्वाभाविक संताप या रसायनातून दिल्लीत तीन दिवस दंगल सुरु होती. चार हजारांवर लोक या दंगलीत ठार झाले होते. इराणचे नेते मोज्तबा खामेनेई यांचे आई-वडील, पत्नी, एक मुलगा असे जवळचे चार नातेवाईक पहिल्या दिवशीच्या हल्ल्यात ठार झाले. आता हेच खामेनेई इराणचे नेते झाले आहेत. त्यांना उग्र आणि कट्टरपंथी मानले जाते. आपल्या कुटुंबातील चार सदस्य गमावल्यानंतर त्यांच्याकडे आणखी गमावण्यासारखे काही राहिले नाही. आपल्याला केव्हाही ठार केले जाऊ शकते याची त्यांना कल्पना आहे. सत्ता, संताप आणि कोणत्याही दिवशी येऊ शकणारा मृत्यू याचे प्रतिबिंब त्यांच्या बेदरकार निर्णयात दिसत आहे. आणि याने सारे मध्यपूर्व आगीच्या ज्वाळांमध्ये धुमसले जात आहे.
खामेनेई जसे बेदरकार वागत आहेत तसेच शक्तिशाली देशाचे नेतेही बेदरकार वागत आहेत. युद्ध सुरु झाले ते इराणच्या अणूप्रकल्पावरून आणि आता स्थिरावले आहे ते होर्मूझच्या खाडीवर. इराणने होर्मूझ खाडी बंद केली आहे. ती पुन्हा सुरु करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करीत आहे. राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासाठी तो जणू प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. इराण असे करेल असे आम्हाला वाटले नव्हते असे अमेरिकन प्रशासन म्हणत आहे. मुळात हे विधानच अमेरिकेच्या बालीशपणाचे आहे. इराणवर हल्ला केल्यास तो जगाची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी होर्मूझ खाडी बंद करेल याचा विचार अमेरिकेने आधीच करावयास पाहिजे होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन अमेरिका – इराण युद्धाबाबत नियमित भाष्य करीत आहेत. ते म्हणतात “माझ्या कारकिर्दीत मी इराणबाबत काही निर्णय घेण्याचा विचार निश्चित केला होता. माझ्या निर्णयावर इराणची काय प्रतिक्रिया असेल याचा अंदाज घेण्यास मी ‘सीआयए’ला सांगितले होते आणि प्रत्येकवेळी सीआयएने मला इराण होर्मूझ खाडी बंद करण्याचा निर्णय घेईल असे सांगितले होते.” इराणचे युद्ध सुरु करताना अमेरिकन प्रशासनाने याचा विचार केला नव्हता काय असा भेदक प्रश्न क्लिंटन यांनी विचारला आहे. अमेरिकेने हे युद्ध सुरु तर केले पण कुठल्याही प्रकारची व्यूहरचना न करता, आपल्या मित्र राष्ट्रांना विश्वासात न घेता, आणि घटनात्मकदृष्ट्या आवश्यक असणाऱ्या अमेरिकन काँग्रेसची मंजुरी न घेता.
अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर तेथील जनमत इराण सरकारविरोधात जाईल, जनता रस्त्यावर येईल व सरकार उलथवून टाकले जाईल असा अमेरिकेचा अंदाज होता तो सपशेल चुकला आहे. कारण तेथील जनता रस्त्यावर जरूर आली आहे ती सरकार विरोधात नव्हे तर इराण सरकारच्या समर्थनात.

इराण विरोधातील युद्ध अमेरिकेच्या विरोधात जाण्याचे मुख्य कारण म्हणजे एका शाळेवर झालेला क्षेपणास्त्र हल्ला व त्यात १७० विद्यार्थिनींचे ठार होणे. प्रथम अमेरिकेने हा हल्ला आम्ही केला नाही असे म्हटले पण ज्या क्षेपणास्त्राने हा हल्ला केला गेला ते ‘टॉमहॉक’ क्षेपणास्त्र अमेरिकेतच तयार होते. त्यामुळे हा हल्ला अमेरिकेनेच केला हे सिद्ध होते. तसेच नवीन आलेल्या माहितीनुसार शाळेची ही इमारत इराणी लष्कराचे केंद्र होती अशी नोंद अमेरिकेकडे होती. नंतर हे केंद्र बंद करून तेथे शाळा सुरु केली होती. मात्र हा नवा बदल अमेरिका लष्करा जवळ नव्हता त्यांनी लष्करी केंद्र समजून शाळेवर हल्ला केला त्यात १७० विद्यार्थिनी ठार झाल्या व तेथील जनमत अमेरिकेविरोधात गेले.
इराणने होर्मूझ खाडी बंद केल्यापासून तेलाच्या किमती झपाटून वाढल्या आहेत. ही खाडी खुली करण्यासाठी चीन, फ्रान्स, ब्रिटन यांनी आपल्या युद्धनौका पाठवाव्या असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मुळात इराणने खाडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तो चीनच्या सांगण्यावरून त्यामुळे चीन युद्ध नौका पाठवणार नाही. ही खाडी बंद झाल्याने चीनचे काही बिघडणार नाही त्याला जगात आर्थिक हाहाकार हवा आहे तसे झाल्यास आपल्या अर्थव्यवस्थेला उठाव मिळेल असे त्यांचे आकलन आहे. इराण आता अमेरिकन बँकांना लक्ष्य करीत आहे ते चीनला हवे आहे.

एकूण काय तर, या युद्धात ट्रम्प पूर्णपणे तोंडघशी पडले आहेत असे दिसते. रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम जगावर झाला पण तो मर्यादित होता. मात्र या युद्धाचा साऱ्या जगावर मोठा परिणाम होणार आहे. युद्धापूर्वी कच्चे तेल ७३ डॉलर प्रति बॅरल होते ते आता ११० डॉलर प्रति बॅरल झाले आहे. रशियासुद्धा या परिस्थितीचा फायदा उठवित आपल्या तेलाच्या किमती वाढविल्या आहेत. भारतासह सर्व देशाना त्याने स्वस्त दरात कच्चे तेल देण्यास नकार दिला आहे. थोडक्यात दोघांचाही (इराण व अमेरिका) बेदरकारपणा नवीन जागतिक समीकरणाची नांदी ठरतो की काय असे वाटू लागले आहे.
ही समीकरणे कशी असतील? जगाचा चेहरामोहरा कसा बदलेल हे मात्र सध्या कोणीच सांगू शकणार नाही.
✍ विवेक देशपांडे
मो. ९४२२८६९५०३

आपले लेख, बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्या करीता संपर्क करा, 9021203010.
www.WaniSamachar.com









