निवडणूक पराभवानंतर डॉ. महेंद्र लोढा यांचा शहर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा !

483

न.प.निवडणूक पराभवानंतर डॉ. महेंद्र लोढा यांचा शहर काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा !


वणी (यवतमाळ), । २९ डिसेंबर २०२५:

अलीकडेच झालेल्या वणी नगरपालिका निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असताना, शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. महेंद्र लोढा यांनी आपल्या पदाचा सन्मानाने राजीनामा दिला आहे. हा राजीनामा यवतमाळ जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांना सादर करण्यात आला असून, त्यात निवडणुकीतील अपयशाची नैतिक जबाबदारी आणि वैयक्तिक व्यावसायिक कारणे अशी प्रमुख कारणे नमूद आहेत.डॉ. लोढा यांनी राजीनामा पत्रात पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार मानले आहेत. शहर अध्यक्ष म्हणून निवडणूक तयारी, पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी स्वतःसह सर्वांनी पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केले, तरीही अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून पद सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, लोढा हॉस्पिटलचे संचालक म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या जबाबदाऱ्या आणि रुग्णसेवेला प्राधान्य देण्याची आवश्यकता यामुळे पक्षकार्यात पूर्णवेळ योगदान देणे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. महेंद्र लोढा हे वणी परिसरातील एक ख्यातनाम वैद्य असून, गेल्या दशक भरापासून राजकारणात सक्रिय आहेत. सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदान उल्लेखनीय आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येही त्यांनी काँग्रेससाठी जोमाने काम केले होते. नगरपालिका निवडणुकीतही ते प्रचारात आघाडीवर होते.

हा राजीनामा वणी शहर काँग्रेससाठी पक्षांतर्गत बदलांचे संकेत देत असून, आता नवीन शहराध्यक्षाची नियुक्ती कोणाकडून आणि कोणाला होणार, याकडे स्थानिक राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस पक्षाने याबाबत अद्याप अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.


 www.WaniSamachar.com