

वणी न.प. निवडणूक २०२५
कुणाल यांचा भाजपला रामराम, तर शिवसेनेला जय महाराष्ट्र !
▪︎कुणाल चोरडिया व तिघांचा शिंदे सभेत भव्य शिवसेना प्रवेश; वणीची निवडणूक आता रंगणार ?
वणी । दि. २६ नोव्हेंबर २०२५ :
यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आज राजकीय वातावरण आणखी तापले. राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते मा. एकनाथ शिंदे यांच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने वणीला हेलिकॉप्टरने धडक देताना एका राजकीय घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले. नुकताच पत्रकार परिषदेत भाजपचा राजीनामा देऊन पक्षाबाहेर पडलेले युवा नेते कुणाल चोरडिया यांनी शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घालत धनुष्यबाण हाती घेतला. त्यांच्यासोबत उमेश पोद्दार, महावीर कटारीया व आशिष गुप्ता यांनीही औपचारिकरित्या शिवसेनेत प्रवेश केला.

शिंदे साहेबांच्या प्रचार सभेच्या व्यासपीठावरच हा सोनेरी क्षण घडला. विजय चोरडिया यांचे चिरंजीव असलेले कुणाल हे यवतमाळ जिल्ह्यातील तरुण प्रभावशाली चेहरा मानले जातात. भाजपचा नुकताच राजीनामा दिल्यानंतर आता त्यांचा हा शिवसेना प्रवेश चर्चेचा विषय बनला आहे. वणीची निवडणूक ही केवळ स्थानिक नाही, तर पक्षाच्या भविष्याची पायाभरणी आहे.
यावेळी कुणाल चोरडिया म्हणाले, “वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत मी शिवसेनेत सामील झालो. वणीच्या विकासासाठी धनुष्यबाणची ताकद लावू.” उमेश पोद्दार, महावीर कटारीया व आशिष गुप्ता यांनीही पक्षप्रवेशाच्या वेळी विकासाच्या मुद्द्यांवर बोलत वणीकरांना विश्वास दिला.

या सभेच्या पार्श्वभूमीवर वणी नगरपरिषद निवडणुकीवर काय परिणाम होतो, हे पाहणे रोमांचक ठरेल. भविष्यातील पक्षबांधणीसाठी हा प्रवेश खूप उपयुक्त ठरेल, कारण यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेची संघटना मजबूत होईल.
www.WaniSamachar.com









