✍लेख : संघाचे “गृह संपर्क अभियान”: एक अद्भुत अनुभव !

834

संघाचे “गृह संपर्क अभियान”: एक अद्भुत अनुभव !


वणी । १५ जानेवारी,२०२६ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात “गृह संपर्क अभियान” राबवले जात आहे. संघाचे काम शिस्तबद्ध आणि निष्ठापूर्ण असते. कोणतीही संघटना स्थापन झाल्यानंतर किती काळ टिकेल हे सांगणे कठीण असते. आतापर्यंत असंख्य संघटना काही काळानंतर लुप्त झाल्या, काहींची नावेही आता कोणाला आठवत नाहीत. अशा परिस्थितीत १९२५ मध्ये परमपूज्य डॉ. केशव बलिराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली आणि आज ती शंभर वर्षांची झाली आहे. ती आता एका वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. जगात कुठेही असा राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेला राष्ट्रीय संघटना नाही. विदेशातही संघाचे काम सुरू आहे.

“मंत्र छोटा, तंत्र सोपे, परी यशस्वी ठरले ते. रीत साधी, शिस्त बांधी, कार्य व्यापक उभविते” या तत्त्वावर संघाचे काम चालते.अशा राष्ट्रीय विचारसरणीशी कटिबद्ध असलेल्या संघाचे सध्या देशव्यापी गृह संपर्क अभियान सुरू आहे. हे अभियान सुमारे २५ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. आपल्या वणी नगरात संघाचे स्वयंसेवक हे अभियान उत्साहाने राबवत आहेत.

संघाच्या कामाच्या दृष्टिकोनातून वणी नगराची १२ वस्त्या विभागण्यात आल्या आहेत. त्यापैकी टिळक नगर वस्तीमध्ये माझा सहभाग आहे. शिस्तबद्ध संघटनेचे शिस्तबद्ध काम असल्याने त्याचे काटेकोर नियोजन केले जाते. मागील महिन्यापासून प्रांत, जिल्हा, तालुका, मंडळ आणि नगर स्तरावर विविध बैठका आणि प्रशिक्षणाचे सत्र चालू होते.

वणी नगरातील अभियानासाठी वस्ती पालक आणि अभियान राबवण्याच्या दृष्टिकोनातून अंतिम बैठक ३० डिसेंबर २०२५ रोजी पार पडली. दुसऱ्याच दिवशी ३१ डिसेंबरला वस्तीस्तरावर बैठकांचे आवाहन संघ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. आमची टिळक नगर वस्तीची बैठक श्री जैताई मंदिरात घेण्यात आली. देशभरात संघातर्फे १ जानेवारी २०२६ रोजी एकाच दिवशी, एकाच वेळी सकाळी ८ वाजता अभियान राबवण्याचे नियोजन करण्यात आले. यात आमच्या वस्तीतील स्वयंसेवक सहभागी झाले होते.

आमची टिळक नगर वस्ती कामाच्या दृष्टिकोनातून खूप मोठी आहे. येथे जवळपास १,००० पेक्षा जास्त घरांचा समावेश आहे. या वस्तीत जैताई नगर, टिळक नगर, रवी नगर, बँक कॉलनी, गुरुवर्य कॉलनी, जि.प. कॉलनी, विनायक नगर, लक्ष्मी नगर, सदाशिव नगर, स्वामी समर्थ नगर, ई. चा समावेश होतो. एवढ्या मोठ्या वस्तीत गृह संपर्क अभियान राबवणे सोपे नव्हते, पण कार्यनिष्ठा आणि समर्पणाच्या भावनेने आमच्या वस्तीतील स्वयंसेवकांनी हे कार्य अवघ्या नऊ दिवसांत पूर्ण केले.

मी स्वतः, अनिलजी आक्केवार, विनूदादा कोंडावार, मिलिंदजी आमलेकर, राकेशजी बुग्गेवार, अथर्व बुग्गेवार, निखिलजी साठे, प्रवीणजी मुणे, राजूभाऊ खुसपुरे अशी आमची टीम होती.प्रत्येक घरी जाऊन आम्ही प्रथम प्रश्न विचारत होतो, “आपणास संघाच्या कामाविषयी माहिती आहे का ?” जवळपास ९९% घरांतून होकारात्मक उत्तर मिळाले. हे उत्तरच आमच्या अभियानाची हुरूप वाढवणारी गुरुकिल्ली ठरली. त्यानंतर आम्ही संघाची स्थापना, व्यक्ती निर्माणाची कार्यपद्धती, संघाच्या कामाचा विस्तार, सेवा कार्य यांची माहिती देत होतो. तसेच देशात सामाजिक बदल घडवण्यासाठी आणि राष्ट्रप्रेम जागृत करून राष्ट्रीयता अंगी बाळगण्यासाठी आवश्यक असलेल्या पंच परिवर्तनचे महत्त्व आणि त्याचे अंगीकरण याबाबत सांगत होतो. शेवटी आम्ही दिलेले पत्रक घरातील सर्वांनी वाचावे, असे आवाहन करत होतो.

या कार्यात जनतेकडून मिळालेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय आणि प्रेरणादायी होता. अभियानात बहुतेक सकाळी गृहिणींची भेट होत असे. त्या माय-माऊलींची संघाविषयीची आत्मीयता पाहून कृतकृत्यतेचा अद्भुत अनुभव येत होता. सकाळची वेळ म्हणजे त्यांची घरकामाची वेळ असते, तरीही त्यांनी आम्हाला वेळ दिला. खरेच म्हणावेसे वाटते की, जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी. प्रत्येक घरी सतत संभाषणामुळे आमच्या तोंडाला कोरडे पडत होते. हे जाणून त्या माय-माऊलींनी आम्हाला पाणी पाजले. कुठे-कुठे तर चहाचा आग्रहही केला.

राष्ट्रकार्यासाठी दारी आलेल्या लोकांसाठी व्यस्त जीवनशैलीतही आदरातिथ्य करण्यास सज्ज असलेल्या त्या माय-माऊलींना त्रिवार वंदन! कुठे फेडावे त्यांचे उपकार!

या अभियानात संघाचे जुने स्वयंसेवकही भेटले. त्यांनी पुन्हा संघकार्यात सहभागी होण्याचे अभिवचन दिले. काही ज्येष्ठ नागरिकांनी दिलेले आशीर्वाद आमच्यासाठी अमूल्य होते. विशेषतः डॉ. आवारी यांच्या वडिलांनी दिलेले आशीर्वाद उल्लेखनीय होते. ते म्हणाले, “इतक्या व्यस्त शैलीतून वेळ काढून संघकार्यास देत आहात, मी तुम्हाला वंदन करतो.” असे म्हणून त्यांनी खरोखरच हात जोडले. त्या क्षणी आम्हा सर्वांना त्यावेळी अवघडल्यासारखे झाले. हा त्यांचा आशीर्वाद समजून आम्ही निरोप घेतला.

सम्पूर्ण अभियानात आमचे ज्येष्ठ स्वयंसेवक विनूदादा कोंडावार पालकासारखे सोबत होते. या वयातही त्यांची धावपळ आणि तत्परता अंगीकारण्यासारखी होती.

माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणारे मिलिंदजी आमलेकर आणि अनिलजी आक्केवार यांची साथ अमूल्य होती. एकही दिवस सुट्टी न घेता १००% योगदान दिले. वस्तीतील लोकांशी त्यांचा परिचय अद्भुत होता. असे प्रामाणिक सहकारी मिळाले तर कोणतेही कार्य अशक्य नाही. वंदन रे गड्यांनो तुम्हाला ! 🙏

निखिलजी साठे, प्रवीणजी मुणे, राजूभाऊ खुसपुरे यांनी दोन दिवस सायंकाळी अभियान राबविले. त्यांचेही सहकार्य अमूल्य होते. राकेशजी बुग्गेवार आणि अथर्व बुग्गेवार यांचे योगदानही दुर्लक्षिणीय नाही.

अजूनही वणी शहरात गृह संपर्क अभियान राबवले जात आहे. स्वयंसेवक आपल्या घरी येतील, तर किमान चार घरी त्यांच्यासोबत जा. कारण हे राष्ट्रकार्य आहे आणि संघाचे काम ईश्वरी कार्य आहे. त्यात सहभाग नोंदवा.चला तर मग, पंच परिवर्तनाचे पालन करून हे राष्ट्र समृद्ध आणि बलशाली करूया.

▪︎शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते—

उसळत्या रक्तात या, ज्वालामुखीचा दाह दे वादळाची दे गती, पण भान ध्येयाचे असू दे

  • ✍ विवेक देशपांडे वणी


आपले, लेख, बातम्या, जाहिरात, ई. प्रकाशीत करण्याकरीता संपर्क करा,

📱9021203010


www.WaniSamachar.com