जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आज घोषणा होणार ?
● राज्य निवडणूक आयोगाची दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद !
मुंबई । दि. १३ जानेवारी २०२६:
महाराष्ट्रातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा आज होण्याची दाट शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथिगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत महत्वाची माहिती जाहीर करणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. यापूर्वी न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. मात्र आरक्षणाच्या गुंतागुंतीमुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या होत्या.
राज्यात एकूण ३२ जिल्हा परिषद आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. यापैकी आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या १२ जिल्हा परिषदा (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर) आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांमध्ये निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. उर्वरित जिल्ह्यांमधील निवडणुका न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार दुसऱ्या टप्प्यात घेतल्या जाणार आहेत.
आयोगाने १५ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्व तयारी केली असून, आजच्या पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रम, मतदानाची तारीख, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत, मतदान आणि निकालाची तारीख यासंदर्भात सविस्तर माहिती जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या निवडणुकांमुळे ग्रामीण महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे ठरतील आणि स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यांना गती मिळेल, असे मानले जात आहे.
www.WaniSamachar.com




