

वणीतील हिंदूत्ववाद्यांचा बांग्लादेशला जय्यत इशारा; ‘हिंदूवर अत्याचार सहन करणार नाही!’
-
मा.आ. संजीवरेड्डी बोदकुरवारांचे आक्रमक भाषण; ‘रक्तात भिनले हिंदूत्व, एकजूट होण्याची वेळ’;
-
जय श्रीरामच्या गगनभेदी घोषणांनी दुमदुमला शिवाजी चौक.
वणी । २७ डिसेंबर, २०२५ :
बांग्लादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हिंसाचार, हत्या आणि प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात वणी शहरात तीव्र आक्रोश व्यक्त करण्यात आला. शनिवारी (२७ डिसेंबर) छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, सनातन संस्था आणि इतर हिंदूत्ववादी संघटनांच्या वतीने आयोजित आंदोलनात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.
माजी आमदार तथा भाजपचे ज्येष्ठ नेते संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आंदोलनावेळी बोलताना आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले, “मी राष्ट्रीय पक्षाचा माजी आमदार असलो तरी माझ्या रक्तात हिंदूत्व भिनले आहे. हिंदू बांधव एकत्र येईपर्यंत बांग्लादेशसारखे अत्याचार थांबणार नाहीत. राजकारणाच्या चपला जोड्या बाहेर ठेवून एक हिंदू म्हणून एकजूट होण्याची गरज आहे. भारतात मोदींसारखे पंतप्रधान असल्याने हिंदू सुरक्षित आहेत, पण पाकिस्तान-बांग्लादेशातील हिंदूंची जबाबदारी आपली आहे.” त्यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला.
आंदोलनात ‘जय श्रीराम’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘हिंदूवर अत्याचार सहन करणार नाही’ अशा घोषणा देऊन बांग्लादेशाचा तीव्र निषेध करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक करताना प्रशांत भालेराव यांनी सांगीतले की, “अत्याचार थांबले नाहीत तर मोठे आंदोलन छेडले जाईल”,.
या आंदोलनास माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, कल्याण पांडे, प्रशांत भालेराव, आशिष सिसोदिया, संदीप मदान, ॲड.खप्रवीण पाठक, अनुराग काठेड, नितीन वासेकर, तुकाराम माथनकर, लक्ष्मण उरकुडे, अंकुश बोढे, लहुजी खामनकर, लोभेश्वर टोंगे, कृष्णा पुरवार, अजिंक्य शेंडे, संतोष लक्शेट्टीवार यांच्यासह हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हा निषेध वणीतील हिंदू समाजाच्या एकजुटीचे प्रतीक मानला जात असून, बांग्लादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडे लक्ष वेधले जात आहे.
www.WaniSamachar.com









