टाबू ने घेतली बोदकुरवार यांची सदिच्छा भेट; अफवांना बोदकुरवारांचा ठाम नकार !

1027

टाबू ने घेतली बोदकुरवार यांची सदिच्छा भेट; अफवांना बोदकुरवारांचा ठाम नकार !

● भाजपला मिळाला स्पष्ट जनादेश;

● कोणाचाही समर्थनाची गरज नाही; वणीचा सर्वांगीण विकासासाठी सहकार्य मात्र सुरू राहणार, बोदकुरवार यांची स्पष्ट भूमिका !


वणी । २५ डिसेंबर, २०२५ :

वणी नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून प्रभाग ९ मधून विजय मिळवलेला अब्दुल हफीज ऊर्फ टाबू यांनी भाजपचे नेते तथा माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची २४ डिसेंबरच्या संध्याकाळी भेट घेतली. ही भेट निवडणुकीतील विजयाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी आणि शहर विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी होती. मात्र, भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने टाबू भाजपला बिनशर्त पाठिंबा देणार किंवा पक्षात प्रवेश करणार अशा अफवा पसरल्या, किंवा पसरवल्या गेल्या.या अफवांना बोदकुरवार यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे पूर्णविराम दिला. ते म्हणाले, “ही भेट केवळ सदिच्छेची होती. टाबू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि नगरपरिषदेत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे, नगराध्यक्ष पदासह संपूर्ण सत्ता आमच्याकडेच आहे. त्यामुळे कोणत्याही अपक्षाचे समर्थन घेण्याची किंवा मागण्याची गरजच नाही, जनतेने आम्हाला पुर्ण व स्पष्ट जनादेश दिलेला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्वना सोबत घेऊन काम करू.”

दुसरीकडे, टाबू यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “अपक्ष विजय मिळवूनही भाजपकडे स्पष्ट बहुमत व सत्ता असल्याने, प्रभागाच्या विकासासाठी, व योग्य निधी मिळविण्या करीता मलाच त्यांची मदत आवश्यक आहे. निधी मिळवणे आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सहकार्य गरजेचे आहे. ही भेट विकासासाठी होती, राजकीय सौदेबाजीची नव्हती. वणीच्या प्रगतीसाठी गरज पडली तर भाजपसोबत उभे राहू,” असेही त्यांनी नमूद केले.

निवडणुकीत भाजपने २९ पैकी १८ जागा, व नगराध्यक्ष पद जिंकून स्पष्ट वर्चस्व प्रस्थापित केले असताना, टाबू सारख्या अपक्ष विजेत्याची ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली. उपनगराध्यक्ष आणि नामनियुक्त नगरसेवकांच्या निवडीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. आता दोन्ही नेत्यांच्या स्पष्टीकरणाने वातावरण निवळले असून, शहरवासीयांच्या नजरा आगामी विकास कामांकडे लागल्या आहेत.


www.WaniSamachar.com