■ वणी नगरपरिषदेची लढत थांबली… आता १९ दिवस ‘निकालाची धाकधूक’!

1088

वणी नगरपरिषदेची लढत थांबली… आता २१ डिसेंबरपर्यंत ‘निकालाची प्रतीक्षा’!

  • ६६.८३% मतदानानंतर शांतता;

  • २१ डिसेंबरला कमळ, धनुष्यबाण की इतर… कुणाची बाजी?

  • दोन आठवडे लांबलेली मतमोजणी,

  • शहरात विजय-पराजयाचे तर्कवितर्क.


वणी । दि. ३ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी):

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मंगळवारी (दि. २ डिसेंबर) ६६.८३ % मतदान झाले आणि गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी अखेर थंडावली.

एकूण ४९,५७१ मतदारांपैकी ३३,१२६ मतदारांनी आपला हक्क बजावला. मतदान शांततेत व जल्लोषात पार पडले, फक्त काही ठिकाणी किरकोळ वाद वगळता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
मात्र, आता सर्वांच्याच नजरा २१ डिसेंबर ऐवजी तब्बल १९ दिवस पुढे ढकललेल्या मतमोजणीच्या तारखेकडे लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग १४ (‘क’ जागा) वरील न्यायालयीन अपीलामुळे मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे विजयाच्या उत्साहात असलेल्या कार्यकर्त्यांनाही आता दोन आठवड्यांची ‘प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरात सध्या निवडणुकीनंतरची अस्वस्थ शांतता आणि सुस्तीचे वातावरण पसरले आहे.
▪︎प्रचारात कोण गाजले?
निवडणूक प्रचारात भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि महा विकास आघाडी (काँग्रेस-मनसे-शिवसेना ठाकरे गट) यांच्यात चुरस होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात कॉर्नर सभा, डोअर-टू-डोअर जनसंपर्क आणि रोडशो यांनी वातावरण तापले होते.
▪︎विशेष गाजलेल्या दोन सभा :
– राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा.
– राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची जाहीर सभा.
तसेच भाजप, शिवसेना, मविआ नेते व इतर पक्षांच्या आजी-माजी आमदारांनी आपापल्या उमेदवारांसाठी प्रभाग अनेकदा पिंजून काढले. प्रत्येक पक्षाने “आम्हीच योग्य” हे मतदारांच्या मनात ठसवण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
▪︎‘हॉट’ ठरलेले प्रभाग :
प्रचारादरम्यान प्रभाग क्रमांक ८, १०, ११, १३ व १४ सतत चर्चेत राहिले. येथे काही “विशेष” मान्यवर निवडणूक लढत असल्याने विजय कुणाचा होणार याबाबत आतापासूनच तर्कवितर्क सुरू आहेत.
▪︎आता फक्त प्रतीक्षा…
मतमोजणी इतकी लांब गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चिंता यांचा संमिश्र भाव दिसतो. काही ठिकाणी विजयोत्सवाची तयारी सुरू आहे, तर काही ठिकाणी “२१ तारखेलाच खरे चित्र समोर येईल” असे म्हणत कार्यकर्ते सुस्तावले आहेत.
▪︎वणीकरांच्या मनात एकच प्रश्न :
२१ डिसेंबरला कमळ, धनुष्यबाण की इतर कोणता चिन्ह मोठ्या संख्येने फुलणार?
निकालाची उत्सुकता आता १८ दिवस शिगेला पोहोचली आहे!

www.WaniSamachar.com