

वणी नगरपरिषदेत भाजपचा दमदार शड्डू : प्रभाग १ साठी विद्याताई आत्रामांसह ‘कमळ’ला प्रचंड मतांनी विजयी करा.
▪︎बोदकुरवार, बोर्डे, चौधरी यांचे थेट आवाहन; “वणीचा विकास कमळानेच शक्य, मंगळवारी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० पर्यंत मतदान”
वणी, दि. १ डिसेंबर २०२५ (विशेष प्रतिनिधी): वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक १ वर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांच्यासह प्रभाग १ मधील दोन्ही जागांवर भाजपचे अधिकृत उमेदवार सौ. मिनाक्षी शैलेश जुनघरे (प्रभाग १-अ, सर्वसाधारण महिला) आणि श्री. उमाकांत (बालू) महादेवराव जोशी (प्रभाग १-ब, ना.मा.प्र. सर्वसाधारण) यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे आणि शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी केले आहे.
भर प्रचारात हे तिघेही नेते प्रभाग १ मध्ये फिरले आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचले.
“वणीचा खरा विकास कमळाच्या हातातच शक्य आहे. केंद्रातील मोदी सरकार, राज्यातील फडणवीस सरकार आणि आता नगरपरिषदेत विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वाखालील कमळाची सत्ता आली तर ‘दिल्ली ते गल्ली’ पर्यंत निधी आणि योजनांचा महाराष्ट्रात कुठेही न पाहिलेली प्रगती वणीला मिळेल,” असे ठाम प्रतिपादन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले. त्यांनी प्रभाग १ मधील मतदारांना “तुम्ही एक मत कमळाला दिलेत तर आम्ही वणीला हायटेक शहर बनवू” अशी ग्वाही दिली.
माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक व महिलांशी संवाद साधताना सांगितले की, “विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागतील. प्रभाग १ मधील रस्ते, पाणी, स्वच्छता, स्ट्रीट लाइट यासह सर्व मूलभूत सुविधा प्राधान्याने पूर्ण होतील.” त्याचबरोबर शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी तरुण वर्गाला आवाहन करताना म्हटले, “तुमच्या हातात कमळाचे बटन आहे, तुम्ही दाबाल तर वणीच्या तरुणांना रोजगार, कौशल्य केंद्र आणि स्टार्टअपसाठी निधी मिळेल.”
या प्रभागात भाजपला मागील निवडणुकांपेक्षा अधिक मते मिळण्याची खात्री पक्षनेत्यांनी व्यक्त केली आहे.

उद्या मंगळवार दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रभाग १ मधील मतदारांना कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून विद्याताई आत्राम यांना नगराध्यक्ष तर मिनाक्षी जुनघरे व उमाकांत जोशी यांना नगरसेवक म्हणून निवडून देण्याचे आवाहन भाजपने केले आहे.
www.WaniSamachar.com









