

वणी । ५ नोव्हेंबर २०२५ :
वणी तालुक्यातील वांजरी गावात आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. १९ वर्षीय तरुण शेतकरी महेश रामभाऊ उज्वलकर याने स्वतःच्या शेतातील झाडाला दोरखंड बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंब आणि संपूर्ण गाव हळहळले आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असले तरी नैराश्य हेच मुख्य कारण असावे, असे प्राथमिक तपासातून सूचित होत आहे.
महेश हे वांजरी गावातील साध्या शेतकरी कुटुंबातील होते. आई-वडील, लहान भाऊ आणि एक बहीण असा आप्तपरिवार असलेल्या महेशने शालेय जीवन संपल्यानंतर शेतीकडे वळून कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याचा निश्चय केला होता. मनमिळावू आणि मेहनती स्वभाव असलेल्या महेशला सर्वजण ओळखत होते. मात्र, आज दुपारी शेतात गेल्यानंतर त्याने अचानक जीवनाविरुद्ध टोकाचा निर्णय घेतला. घरच्यांना संशयास्पद वाटले असता शेताकडे धाव घेतली, तेव्हा महेश दोराला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. ही दृश्य पाहून कुटुंबीयांना धक्का बसला आणि घटनेची माहिती तात्काळ वणी पोलीस स्टेशनला देण्यात आली.

वणी पोलिसांनी घटनास्थळी त्वरित हजेरी लावली आणि पंचनामा पूर्ण करून महेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, आत्महत्येच्या मागील पार्श्वभूमीचा शोध घेतला जात आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संघर्षमय जीवन आणि युवकांमधील नैराश्याच्या वाढत्या घटनांमुळे हे प्रकरण अधिक गंभीर ठरते आहे. अलीकडील काळात अशा घटनांची संख्या वाढल्याने पालक आणि समाज सतर्क झाला आहे.
महेशच्या अकाली जाण्याने वांजरी गावात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यांच्या उमेदीला नव्याने धक्का बसला आहे. कुटुंबाच्या दु:खात सहभागी होण्यासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. वणी पोलिस तपास अखेरपर्यंत चालवतील, अशी अपेक्षा आहे.
www.WaniSamachar.com
■□■









