

वणी नगर परिषद निवडणूक: भाजपच्या तिकीटासाठी रांग ! १३५ इच्छुकांची धडक , ७ महिलांची अध्यक्षपदासाठी ‘इंटरव्ह्यू’ !
वणी । ०५ नोव्हेंबर २०२५ :
-
उमेदवारी करीता गर्दी: भाजपकडे सर्वाधिक इच्छुक, पक्षश्रेष्ठींच्या मुलाखतीला गर्दी
-
महिला शक्तीचा उदय: नगराध्यक्षपदासाठी ७ महिलांचा दावा, नव्या चेहऱ्यांची स्पर्धा
-
भाजपची रणनीती जोरात: प्रभागनिहाय प्रभारी, सर्व्हेने उमेदवार निवड.
-
विकासाची गॅरंटी: फडणवीसांच्या निधीतून वणीचा कायापालट, बोदकुरवारांचे आश्वासन.
-
निवडणूक बिगुल वाजले: माजी नगरसेवकांचे पुनरागमन, तरुण-व्यावसायिकांचा उत्साह.
-
भाजप नेते – कार्यकर्ते आपसी मतभेद विसरून, नगर परिषद जिंकण्यासाठी एकदिलाने लागले कामाला.

वणी शहरात निवडणुकीचा भोंगा वाजताच, सत्तेच्या खुर्चीचे स्वप्न पाहणाऱ्यांची गर्दी उसळली आहे! नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांसाठी सर्वच पक्षांत उमेदवारीची धांद उडाली असली, तरी भाजपच्या दारात सर्वाधिक झुंबड दिसतेय. पक्षनेत्यांना खूश करण्यासाठी कार्यकर्ते ‘जादूची फंडे’ वापरतायत – कधी शिफारसपत्र, कधी गटबाजीचा दबाव !
भाजपने मात्र निवडणूक रणनीती ‘टॉप गियर’ मध्ये टाकली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ११ अर्ज आले, त्यातून छाननी नंतर ७ जणांची मंगळवारी वरिष्ठ नेत्यांनी कसून मुलाखत घेतली. या ७ महिला उमेदवार आपल्या नेतृत्वाचा दावा ठोकतायत ! दुसरीकडे, २९ नगरसेवक जागांसाठी थक्क करणारे १३५ अर्ज भाजपकडे दाखल झालेत. विजयी उमेदवार शोधण्यासाठी पक्षाने प्रभागनिहाय प्रभारी नेमले, तर खाजगी सर्व्हे’द्वारे उमेदवारांची ‘पॉप्युलॅरिटी टेस्ट’ सुरू आहे.

गेल्या आठवड्यापासून शहरात उमेदवारीची ‘हॉट रेस’ सुरू झालीय. माजी नगरसेवक पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत, तर नव्या पिढीचे तरुण, व्यावसायिक आणि शिक्षित चेहरेही रिंगणात उतरायला उत्सुक! पक्षांतर्गत गटबाजी, स्थानिक समीकरणे आणि शिफारशींचा पाढा वरिष्ठांसमोर मांडला जातोय.आता पक्षनेत्यांसमोर संतुलन साधत उमेदवार निवडणं हे खरं आव्हान!

वणीच्या विकासाची बाजूही तितकीच दमदार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील कार्यकाळात कोट्यवधींचा निधी खर्चवला – रस्ते, उद्याने, सांस्कृतिक सभागृह, पाणीपुरवठा योजना असे अनेक प्रकल्प पूर्ण झाले.
“पुढेही निधीची कमतरता पडू देणार नाही,” असं आश्वासन माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिलंय.
वणीची निवडणूक आता ‘विकास vs वर्चस्व’ की ‘जुने vs नवे’ असेल? पाहूया कोण मारतो बाजी!
www.WaniSamachar.com
■□■









