✍ लेख : “पालकांनो सावध असा !”

1645

“पालकांनो सावध असा !”


वणी । दि. २१ जानेवारी २०२६ :काल दैनंदिन कामाच्या फिरण्यामध्ये एक विचित्र प्रकार पहायला मिळाला. तसे आजकाल हे नित्याचेच झाले आहे. बरेचसे वाचकही अनभिज्ञ नसतीलच.

आपल्या बसस्थानका मागील रोडने जात असताना काही मुले व मुली दिसल्या. त्यातील एक प्रकार तर फार किळसवाणा होता, पाहून फार वाईट वाटले. त्यातील मुली ह्या 15 ते 16 वयोगटातील असाव्यात तर मुले 20 ते 25 वयोगटातील असावेत. मी त्यांना हटकल्यावर ते पळून गेले.

किती किळसवाणे प्रकार सुरु आहेत सध्या. ज्या वयात कशाशी काय खायचे याची अक्कल नसते, त्याच वयात काय करुन राहिली ही मुले.

या मुलींचे पालक आपली मुलगी ट्युशन किंवा शाळेत गेली म्हणून निर्धास्त असतील पण या काय करताहेत? यांच्या अजाणतेचा, अज्ञानतेचा कोणी फायदा तर घेत नसतील नां! एक जबाबदार पालक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही?
प्रत्येक पालकाने आपली जबाबदारी पार पाडलीच पाहिजे.

केवळ उत्तम प्रकारचे कपडे, गाडी, चांगल्या शाळेत ऍडमिशन, शिकवण्या लावून देणे म्हणजेच आपण पालकत्वाची जबाबदारी उत्तम पार पाडतो असे नाही, तर आपला पाल्य रोज शाळेत जातो की नाही, शिकवणी वर्गात रोज पोहचतो की नाही, त्याचे किंवा तिचे मित्र मैत्रिणी कोण आहेत. शाळेत किंवा शिकवणी वर्गात तिचा किंवा त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, ही पाहण्याची जबाबदारी कोणाची ? आपण हे जर करीत नसू तर आपल्याला एक दिवस निश्चित पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जागरूकता फार महत्वाची आहे, असे मला वाटते.

आजकाल मुली उन्हाळा असो वा नसो स्कार्फ बांधतात, त्यामुळे कुणाची मुलगी आहे हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे. मला सर्वच मुलींना दोष द्यायचा नाही पण त्या स्कार्फ चा गैरफायदा घेतला जात आहे.

सर्वप्रथम ही प्रथा बंद केली पाहिजे. मुलींना आपण सांगितलं पाहिजे तू जशी आहेस तशीच आमच्या साठी परी आहेस. पूर्वीच्या काळी कुठे होती अशी फॅशन. पूर्वी उन नव्हते कां? त्यावेळी आमच्या आई बहिणी काळ्या पडल्या कां? मग त्यांचे लग्न राहिले कां? असे त्यांना आपण पालकांनी समजावून सांगितले पाहिजे.

रोज दिवसातून कमीतकमी एकदातरी पाल्यांशी आपला संवाद झालाच पाहिजे. आपली आर्थिक परिस्थिती कशी आहे, मुलांच्या संगोपनात आपल्याला किती कष्ट पडताहेत याची कल्पना पाल्यांना असलीच पाहिजे म्हणजे त्यांना जबाबदारिची जाणीव होईल व ते वाममार्गाला लागणार नाहीत.

यावेळी आपणास मला माहिती असणारी दोन उदाहरणे सांगावीशी वाटते.

एका उच्च शिक्षित परिवारातील मुलगी जीला आई वडिलांनी कुठलीही कमी पडू दिले नाही. एखाद्या परीकथेतील परी प्रमाणे तीचे संगोपन केले. अती लाडात वाढलेली ती पोर एका मुलाच्या प्रेमात पडते. मुलगा असा की ज्याची संस्कृती पूर्णतः भिन्न. आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करुन स्वतः चे वाटोळे करुन घेते.

दुसरा प्रकार एका मुलाचा. मुलाचे आईवडील दोघेही प्राध्यापक. घरी प्रचंड आर्थिक सुबत्ता त्यामुळे उच्च शिक्षणासाठी त्याला इंग्लंडला पाठवले जाते. आपल्या देशात असतानाच तो व्यसनाधीन झाला असतानासुद्धा त्याला परदेशात पाठवले जाते. तेथे तो आणखी व्यसनाधीन होऊन एके दिवशी तेथील बार मधे दारूच्या नशेत बलात्कार करतो त्यात त्याला 16 वर्षाची सजा झालेली आहे. आणि त्याचे आई वडील आपल्याला गावात तोंड दाखवण्याची उजागरी राहिली नाही म्हणून राहते घर विकून दुसऱ्या गावात रहायला गेले आहेत.

कशामुळे झालं हे मित्रांनो! काहीतरी चूक असेल नं ही पालकांची! उद्या आपलाही नंबर नको नं लागायला. वरील पालकांमधे मग काळजी घ्यायला पाहिजे की नाही?

“बोलात बोबडीच्या संगीत जागविले , लय ताल सूर दोघे सहजीच लेवविले.
एकेक सूर यावा न्हाऊन अमृताने, अवघ्याच जीवनाचे व्हावे सुरेल गाणे. “

अशीच भावना मुलीची पाठवणी करताना प्रत्येक बापाची असते नां ! मग नकळत्या वयात त्यांना आपली सोबत आसावयास पाहिजे की नाही? त्यामुळे त्यांची काळजी घ्या. सावध असा.

विवेक देशपांडे
9422869503


उपरोक्त लेखात मांडलेले विचार, हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे, या लेखाशी WaniSamachar.com सहमत असेलच असे नाही.


आपले लेख, बातमी व जाहिरात प्रसिद्ध करण्या करीता संपर्क करा : 9021203010.


www.WaniSamachar.com