
आदर्श विद्यालय मार्डीच्या विद्यार्थ्यांची ‘व्यापारी मित्र’ पतसंस्थेला शैक्षणिक भेट: बँकिंग व्यवहारांची प्रत्यक्ष माहिती !
मार्डी (यवतमाळ) । १ जानेवारी २०२६:
मार्डी येथील आदर्श विद्यालयाने विद्यार्थ्यांना व्यावहारिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने एक अनोखा उपक्रम राबवला. शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मार्डी येथील व्यापारी मित्र नागरी सहकारी पतसंस्थेला शैक्षणिक भेट दिली. या भेटीचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना बँकिंग व्यवहार कसे केले जातात, याची प्रत्यक्ष व सविस्तर माहिती करून देणे होते.
पतसंस्थेचे व्यवस्थापक मिलिंदजी पचारे यांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांच्यासह कर्मचाऱ्यांनी बचत खाते उघडणे, ठेवी जमा करणे, कर्ज प्रक्रिया, ऑनलाइन व्यवहार, पासबुक, चेकबुक अशा विविध बँकिंग प्रक्रियांची कार्यपद्धती सोप्या भाषेत समजावून सांगितली. तसेच, बचतीचे महत्त्व, आर्थिक नियोजन आणि सहकारी संस्थांच्या कार्याची माहितीही दिली. प्रत्यक्ष काउंटर आणि इतर विभाग पाहून विद्यार्थी भारावून गेले.
ही माहिती घेऊन विद्यार्थी अतिशय आनंदित झाले. अनेकांनी पहिल्यांदाच बँकिंगचे प्रत्यक्ष कार्य पाहिले असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. हा उपक्रम विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यावहारिक जीवनातील आर्थिक साक्षरता देणारा ठरला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या वतीने शिक्षक दातारकर सर, एटी सर, अलोने आणि पटणे मॅडम यांनी विशेष मेहनत घेतली. पतसंस्थेच्या वतीने व्यवस्थापक मिलिंदजी पचारे, पूजा राजूरकर, शितल ताठे आणि आनंद गोहने यांनी मार्गदर्शन करून कार्यक्रमाला यशस्वी केले.
अशा शैक्षणिक भेटींमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहारांची ओळख होत असून, भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल, अशी भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
www.WaniSamachar.com










