वणी नगरपरिषद निवडणूक निकाल : भाजपचा दणदणीत विजय, विद्याताई आत्राम नगराध्यक्षा; १८ नगरसेवकांसह भाजपची एकहाती सत्ता!

1514

वणी नगरपरिषदेत भाजपचा दणदणीत विजय : विद्याताई आत्राम नगराध्यक्ष, पक्षाला १८ नगरसेवकांसह बहुमत

▪︎शिवसेना (शिंदे)ला एकही जागा नाही; मविआला ९ जागा, अपक्ष २; बोदकुरवार ठरले विजयाचे शिल्पकार, कार्यकर्त्यांत जल्लोष.


वणी । दि. २१ डिसेंबर २०२५ :

वणी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज आत्राम यांनी आपल्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेना (उबाठा) चा डॉ. संचिता नगराळे यांचा सुमारे ४,७९२ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करत विजय मिळवला. पक्षाला २९ नगरसेवक जागांपैकी १८ जागा मिळाल्या असून, उपाध्यक्ष पदही भाजप कडेच राहणार आहे. महा विकास आघाडीला ९ जागा (शिवसेना उबाठा ६, काँग्रेस ३), तर अपक्षांना २ जागा मिळाल्या. शिवसेना (शिंदे गट)ला मात्र एकही जागा जिंकता आली नाही.

मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू होऊन ६ फेऱ्यांत पूर्ण झाली. पहिल्या फेरीपासूनच विद्याताई आत्राम यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम ठेवली. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांत जल्लोष केला. शहरात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या गेल्या, गुलाल उधळला गेला आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

Call : 9021203010.

या विजयाचे खरे शिल्पकार माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार ठरले. त्यांनी प्रचाराची पूर्ण धुरा स्वतःच्या खांद्यावर घेऊन शहराच्या प्रत्येक प्रभागात अक्षरशः धडक दिली. शहराध्यक्ष ऍड. निलेश चौधरी यांनी संपूर्ण नियोजन आणि प्रचार यंत्रणा सांभाळली, तर सर्व स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने काम करत हा विजय खेचून आणला.भाजपचा विजयी नगरसेवकांमध्ये रिता पहापळे, वैशाली वाटीले, लक्ष्मण उक्कुंड, अर्चना पुनवटकर, प्रकाश बुरगोटे, सोनाली निमकर, दीपक नामदेवराव, धर्मादिना पाते, विलास डांगे, उषा कुकडे, नितीन धाबेकर, प्रमिला चौधरी, आरती वांढरे, अनिल चिंडालिया, रेखा कोवे, लवली लाल, पूजा रामगिरवार, मनोज सीडाम, मनीषा गव्हाणे आणि अर्चना शंकर यांचा समावेश आहे.

शिवसेना (शिंदे गट)ला अपेक्षित यश मिळाले नाही. अलीकडेच भाजप सोडून या गटात प्रवेश करणारे विजय चोरडिया यांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि पक्षाला खातेही उघडता आले नाही. महा विकास आघाडीत शिवसेना (उबाठा)ने तर काँग्रेसने ३ जागा जिंकल्या. अपक्ष म्हणून धनराज भोंगळे आणि अब्दुल हाफिज यांची निवड झाली.

विजयानंतर माजी आमदार बोदकुरवार यांनी वणीकरांना हात जोडून धन्यवाद दिले आणि विकासाच्या नव्या योजनांचे आश्वासन दिले. विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात वणीला हायटेक शहर बनवण्याचा संकल्प व्यक्त केला जात आहे. शहरात सध्या विजयाच्या उत्साहाचे वातावरण आहे आणि पुढील पाच वर्षांत विकासाच्या नव्या अध्यायाची अपेक्षा व्यक्त होत आहे.


● भाजपचे निवडून आलेले नगरसेवक :

रिता महेश पहापळे, वैशाली विनोद वाटीले, लक्ष्मण महादेव उरकुडे, अर्चना संजय पुनवटकर, राकेश लक्ष्मण बुग्गेवार, सोनाली प्रशांत निमकर, रितीक लक्ष्मण मामीडवार, उषा डुकरे, नितीन धाबेकर, प्रमिला चौधरी, आरती वांढरे, अनिल चिंडालिया, रेखा कोवे, लवली लाल, पूजा रामगिरवार, मनोज सिडाम, मनीषा गव्हाणे, अर्चना झिलपे.

● महाविकास आघाडीचे विजेते :

शिवसेना (उबाठा) – अजय पांडुरंग धोबे, प्रणाली गणेश देऊळकर, अनिकेत बदखल, सुधीर थेरे, किरण देरकर, गुलाम रसूल रंगरेज;

काँग्रेस – करुणा कांबळे, अलका मोवाडे, सैफुर रहमान.

● अपक्ष विजेते :

धनराज रमेश भोंगळे, अब्दुल हाफीज.


या विजयाने भाजपने २०१६ च्या परंपरेला कायम ठेवले असून, विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात वणीचा विकास वेगवान होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शहरात निकालानंतर उत्साहाचे वातावरण असून, पुढील पाच वर्षांच्या विकासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


www.WaniSamachar.com