वणीतील पत्रकार रवी ढुमणे आत्महत्या प्रकरण : जमीन व्यवहारातील फसवणुकीमुळे टोकाचे पाऊल, सुसाईड नोटमध्ये व्यावसायिकाच्या नावाचा उल्लेख !

1680

वणीतील पत्रकार रवी ढुमणे आत्महत्या प्रकरण : जमीन व्यवहारातील फसवणुकीमुळे टोकाचे पाऊल, सुसाईड नोटमध्ये व्यावसायिकाच्या नावाचा उल्लेख


वणी । दि. १८ डिसेंबर २०२५ :

वणी शहरातील विद्यानगरी भागात राहणारे पत्रकार रवी ढुमणे (वय ५५) यांनी १५ डिसेंबर रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात सुसाईड नोट मधून गंभीर आरोप समोर आले आहेत. मृतकांनी लिहिलेल्या नोटमध्ये शहरातील एका व्यावसायीकाच्या नावाचा थेट उल्लेख करत जमीन विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचे नमूद केले आहे.

सुसाईड नोटनुसार, रवी ढुमणे यांची शेती विक्रीसाठी तोंडी करार झाला होता. व्यावसायीकाच्या सल्ल्यानुसार शेतीवर कर्ज काढण्यात आले, जेणेकरून विक्री सोपी होईल. मात्र, कर्ज घेतल्यानंतर व्यवहार रखडला आणि शेतीवर कर्जाचा बोजा वाढला. बँकेच्या सततच्या नोटिसा आणि दबावामुळे आर्थिक व मानसिक तणाव वाढून असह्य झाला, असे कारण त्यांनी नोटमध्ये लिहिले आहे.

या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब अशी, की शेतीवर रवी ढुमणे यांच्या पत्नीच्या नावाने गडचांदूर येथील एका बँकेतून मोठ्या रकमेचे कर्ज काढण्यात आले. हे कर्ज शेतीच्या मूल्यापेक्षा जास्त असून, रवी किंवा त्यांच्या पत्नीने बँकेत हजेरी लावली नव्हती. मृतकांचा मुलगा नयन ढुमणे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत व्यावसायिक आणि त्याच्या चार साथीदारांवर (एकूण पाच जण) संगनमताने फसवणूक करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केल्याची माहीती आहे.

या घटनेने वणीतील पत्रकारिता क्षेत्र आणि स्थानिक समाजात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबीयांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून, तपास सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत कारवाईचा अपडेट अद्याप समोर आलेला नाही.

आर्थिक फसवणुकीमुळे उद्भवलेल्या मानसिक तणावाच्या या घटनेने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकरणांमध्ये वेळीच मदत मिळणे किती महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष वेधले जात आहे.


www.WaniSamachar.com