

झरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिला चौधरी यांची अविरोध निवड निश्चित
झरी (जि. यवतमाळ) । दि. ०५/१२/२०२५ :
झरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाच्या शिला पुंडलिक चौधरी यांची अविरोध निवड निश्चित झाली आहे. एकमेव वैध अर्ज दाखल झाल्याने त्यांच्यावरच नगराध्यक्ष पदाची जबाबदारी येणार असून, अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे.
यापूर्वी नगराध्यक्ष पदी असलेल्या सौ. ज्योती संजय बिजगुंनवर यांच्या विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. त्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली. आज (ता. ५ डिसेंबर) सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती.

या वेळेत शिंदे शिवसेना गटाच्या शिला पुंडलिक चौधरी यांनी एकूण दोन अर्ज दाखल केले. दुपारी २ वाजता झालेल्या छाननीत त्यांचे दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले. अन्य कोणत्याही इच्छुकाने अर्ज दाखल न केल्याने शिला चौधरी यांची नगराध्यक्षपदी अविरोध निवड पक्की झाली आहे.
पुढील प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची राहील आणि येत्या १५ डिसेंबर रोजी त्यांची अधिकृतपणे नगराध्यक्ष म्हणून घोषणा होईल, अशी माहिती मिळत आहे..
नव्या नगराध्यक्षाची निवड कोण होणार, याकडे गेल्या काही दिवसांपासून झरी शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. आता शिला चौधरी यांच्याकडे शहराच्या विकासाची धुरा सोपवली जाणार असल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा दोन्ही वाढल्या आहेत.
www.WaniSamachar.com









