

वणी । 31 ऑक्टोबर :
वणी तालुक्यातील कोलार पिंपरी येथील हिलटॉप कंपनीचा कामगारांना दिवाळी बोनस मिळवून देण्यात माजी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा नेते तारेन्द्र बोर्डे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून या पार्श्वभूमीवर ब्राम्हणी, गोवारी, निळापूर, कोणा, पिंपरी, कोलार, अहेरी आणि भुरकी या गावांतील सुमारे ७० ते ८० कामगारांनी आज तारेन्द्र बोर्डे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी बोर्डे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व कामगारांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमाला भाजपा यवतमाळचे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष पवन ऐकरे, वणी तालुकाध्यक्ष प्रदीप जेऊरकर, महामंत्री हेमंत गौरकर तसेच माजी नगरसेवक नितीन चाहणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी कामगारांच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांना पक्षात मनापासून सामील करून घेतले.
तारेन्द्र बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली कामगार हितासाठी सातत्याने होत असलेल्या कार्यामुळे स्थानिक जनतेत आणि कामगार वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. कामगारांनी सांगितले की, बोर्डे यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करून बोनसचा प्रश्न मार्गी लावला, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे.

भाजपा नेत्यांनी कामगारांना आश्वासन दिले की, पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या हितांचे रक्षण केले जाईल आणि विकासकामांना गती दिली जाईल. हा पक्षप्रवेश स्थानिक राजकारणात भाजपाची ताकद वाढवणारा ठरला आहे
■□■








