✍ शपथविधी… एवढी घाई का ?

735

शपथविधी… एवढी घाई का?


▪︎वणी । ३ फेब्रुवारी २०२६ :

दि. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या अजितदादांच्या अपघाती निधनानंतर दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांनी शपथ घेतली व विविध चर्चांना उधाण आले. काहींनी तर “सुनेत्राताई तुमचे चुकले” म्हणून अग्रलेखही लिहिले.

सुनेत्राताई पवार ह्या तशा राजकीय घराण्यातूनच आलेल्या आहेत. त्यांचा जन्मच मुळात राजकीय घराण्यात झाला व सासरही महाराष्ट्रातील मातब्बर राजकीय घराणेच मिळाले. कुठल्याही राजकीय नेत्याच्या पत्नीला वैयक्तिक जीवन जगणे दुरापास्तच असते. राजकीय नेता हा घराबाहेरच असतो, त्यामुळे घर सांभाळणे, मुले सांभाळणे, त्यांना घडवणे, पतीचा व्यवसाय सांभाळणे तसेच विविध प्रसंगी नवऱ्याची सोबत करणे ही कामे पत्नीला करावीच लागतात.

“कुठल्याही यशस्वी पुरुषामागे पत्नीचा हात असतो” असे म्हणतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपले आमदार संजयभाऊ देरकर यांच्या पत्नी सौ. किरणताई देरकर. संजयभाऊंच्या विजयात किरणताईंचा सिंहाचा वाटा आहे. मी तर असे ऐकले आहे की, कुठल्याही कार्यक्रमावरून घरी परत आल्यावर किरणताईंना समजले की आपल्याकडे चार कार्यकर्ते जेवणार आहेत, तर त्या स्वतः पदर खोचून स्वयंपाकाला लागतात. अशा अर्धांगिनी ज्या राजकारण्याला लाभतात, त्यांचा लोकसंग्रह वाढतो व त्यांचे राजकीय जीवन उंचावते.

सुनेत्राताईही याला अपवाद कशा असतील? स्व. अजितदादा बराच काळ उपमुख्यमंत्री राहिले, त्यामुळे त्यांना राज्यभर दौरे करावे लागत होते. त्यांच्या मतदार संघातील कामांवर देखरेख, लोकांचे प्रश्न, कार्यकर्त्यांची विचारपूस सुनेत्राताईच करीत होत्या. दादांचा संपर्क होताच, पण पत्नीने उचललेल्या भारामुळे मतदार संघातील जनता खूष असल्याने दादा शेवटपर्यंत अपराजित राहिले.

तिसरा दिवस झाल्याबरोबरच या बाईने उपमुख्यमंत्री म्हणून शपथ कशी घेतली, म्हणून बऱ्याच जणांच्या पोटात गोळा आला. “दशक्रिया होईपर्यंत थांबता आले नसते का?” असाही एक मतप्रवाह दिसून आला. तसे पाहिले तर राजकीय लोकांना दुःखसागरात बुडून राहून घरी बसून राहण्याची सोय नसते. पक्षातील नेते, कार्यकर्ते यांना जोडून ठेवावेच लागते. त्यामुळे त्यांना झटपट शपथविधी उरकावा लागला असेल.

दादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाला होता, अशावेळी पक्ष एकसंघ ठेवणे अति आवश्यक असते. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाले आहेत, त्यातला दादांचा पक्ष हा मोठा आहे व हे अलीकडील विधानसभा, नगरपालिका निकालावरून स्पष्टही झाले आहे. लोकप्रिय नेत्याचा राजकीय पक्ष वाऱ्यावर सोडून चालत नाही. आपले तथा मुलांचे राजकीय जीवन घडवण्यासाठी पुढाकार घ्यावाच लागतो.

स्व. दादांच्या निधनानंतर त्यांनी पवार साहेबांपासून वेगळा केलेला व वर्चस्व प्रस्थापित केलेला पक्ष पुन्हा पवार साहेबांकडे जातो की काय, असे वाटण्यास वाव होता. तसे प्रयत्नही दिसून येत होते, पण या एका खेळीने हे सर्व प्रयत्न धुळीस मिळाले. यात काकांचा नातूही आघाडीवर होता. त्याने ‘काकांचा वारस पुतण्या’ म्हणून पोस्टरही लावले होते. काका अपत्यहीन असेल तरच पुतण्या वारस ठरतो, इथे तर दादांना दोन मुले आहेत, मग आपण वारस कसे ठरू याचेही भान या पुतण्याने ठेवले नाही. तिकडे ताईही कामाला लागल्याच होत्या. साहेबांचे उरलेसुरले शिलेदारही दिमतीला होते.

ही सर्व परिस्थिती ओळखून दादांच्या पक्षाचे नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, मुंडे हे सरसावले. यात त्यांना खंबीर साथ मिळाली ती मित्र पक्षाची. त्याचीच परिणीती शपथविधीत झाली. “देवाची साथ असेल तर कोणतेही काम अयशस्वी होत नाही.”आले देवाजीच्या मना तेथे कुणाचे चालेना?” मग इथे काय होणार होते, वस्तादचे सर्व डाव अयशस्वी झाले.

इतिहासामध्ये डोकावून पाहिले असता, तातडीने उत्तराधिकारी नेमणे हे काही पहिल्यांदाच घडले आहे असे नाही. स्व. इंदिराजी यांच्या हत्येनंतर त्याच दिवशी स्व.राजीवजी गांधी यांचा पंतप्रधान म्हणून शपथविधी झाला होता. त्यामुळे “दशक्रियेपर्यंत का थांबला नाही?” हा आरोप तकलादू ठरतो. पती निधनानंतर त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करणे हे पत्नीचे कर्तव्य ठरते, त्यामुळे सुनेत्राताईंचा हा निर्णय घाईचा किंवा चुकीचा आहे असे मला वाटत नाही.

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, एवढी मोठी जबाबदारी सुनेत्राताईंना पेलवेल का? मला वैयक्तिकरीत्या असे वाटते की, त्या या नवीन भूमिकेला व्यवस्थित न्याय देतील. पती निधनानंतर निर्माण झालेली सहानुभूतीची लाट जबाबदारी सांभाळण्यास सहाय्यभूतच ठरेल. माहेरापासून सुरू झालेली राजकीय घडण व सासरीही तेच वातावरण, यामुळे राजकारण, शह-काटशह, लोकसंग्रह यांचा मेळ त्या व्यवस्थित ठेवतील. त्यांची सर्वात जमेची बाजू म्हणजे ‘देवाभाऊ’ सारखा त्यांच्या पतीचा मित्र-सखा, अत्यंत विश्वासू सहकारी, मुख्यमंत्री म्हणून लाभला आहे. त्यामुळे त्या यशस्वी होतीलच अशी आशा करण्यास हरकत नसावी.

दादांच्या अकाली जाण्याचे दुःख आहेच, पण दादांच्या पश्चात ‘शिवधनुष्य’ पेलायला निघालेल्या या रणरागिणीला शुभेच्छा देऊया!

तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढील लेखात एखाद्या नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार.

✍ विवेक देशपांडे, वणी
📱 ९४२२८६९५०३


उपरोक्त लेखात मांडलेले विचार, हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे, या लेखाशी WaniSamachar.com सहमत असेलच असे नाही.


आपले लेख, बातमी व जाहिरात प्रसिद्ध करण्या करीता संपर्क करा, 9021203010.


www.WaniSamachar.com