

वणी नगरपरिषदेत शिवसेना (उबाठा) चा गटनेतेपदी सुधीर थेरे यांची निवड; जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत सादरीकरण !
वणी । दि. ६ जानेवारी २०२६:
वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी सुधीर रीमदेव थेरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. ही निवड पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांमध्ये एकमताने झाली असून, आजच अधिकृतपणे ती जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आली.
वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वात शिवसेना (उबाठा) चे सर्व सहा नगरसेवक जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय निखाडे आणि शहरप्रमुख विनोद ढूमने यांचीही प्रमुख उपस्थिती होती. नवनिर्वाचित गटनेते सुधीर रीमदेव थेरे यांच्यासह सौ.प्रणाली गणेश देऊळकर, अजय पांडुरंग धोबे, अनिकेत अनिल बदखल, सौ. किरण शंकर देरकर आणि गुलामरसूल रंगरेज वली या नगरसेवकांनी अधिकृत पत्र सादर केले.
निवडणुकीत शिवसेना (उबाठा) पक्षाने काँग्रेस आणि मनसे यांच्यासह महाविकास आघाडीच्या छत्राखाली निवडणूक लढवली होती. मात्र एकूण २९ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदांपैकी शिवसेना (उबाठा) ला सहा, तर काँग्रेसला तीन अशी एकूण नऊ जागांवर समाधान मानावे लागले. तरीही पक्षाने आपल्या नगरसेवकांमध्ये एकजूट दाखवत गटनेतेपदी सुधीर थेरे यांची निवड करून संघटनात्मक बळ दाखवले आहे.
गटनेते सुधीर थेरे यांच्या निवडीमुळे नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांचे प्रतिनिधित्व अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा पक्ष कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. आगामी काळात शहर विकासाच्या मुद्द्यांवर आघाडीच्या नगरसेवकांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असे संकेत मिळत आहेत.
(बातमी स्थानिक राजकीय घडामोडींवर आधारित)
www.WaniSamachar.com









