

वणी नगरपरिषदेत राकेश बुग्गेवार यांची भाजप गटनेतेपदी नियुक्ती !
वणी / यवतमाळ । दि. ३१ डिसेंबर २०२५:
यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत विजय मिळवला होता. एकूण २९ जागांपैकी भाजपने थेट १८ नगरसेवकांसह नगराध्यक्षपदही बहुमताने पटकावले. या यशाने वणीतील राजकीय वातावरणात भाजपची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
आज दि. ३१ डिसेंबर रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृतपणे राकेश बुग्गेवार यांची वणी नगरपरिषदेत भाजप गटनेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली.
ही निवड काल दि. ३० डिसेंबर रोजी वणी येथील भाजप कार्यालयात झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत निश्चित झाली होती. या बैठकीला माजी आ. संजिवरेड्डी बोदकुरवार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम आणि वणी शहर भाजप अध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत सर्व नगरसेवकांनी एकमताने राकेश बुग्गेवार यांना गटनेतेपदी निवडण्याचा ठराव मंजूर केला. आज जिल्हाधिकारी कार्यालयात ही निवड अधिकृतपणे नोंदवण्यात आली.
राकेश बुग्गेवार हे दुसऱ्यांदा भाजपचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या राजकीय कारकीर्दीत प्रामाणिकपणा, जनसंपर्क आणि पक्षनिष्ठा यामुळे त्यांना पक्षात आणि जनतेत विशेष मान आहे. गटनेतेपदी त्यांची निवड झाल्याने भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सर्वत्र त्यांच्या निवडीचे कौतुक होत असून, वणीच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगराध्यक्ष विद्याताई आत्राम यांच्या नेतृत्वात आणि गटनेते राकेश बुग्गेवार यांच्या मार्गदर्शनात भाजप बहुमताच्या बळावर वणी नगरपरिषदेच्या विकासाला नवी गती मिळेल, असा विश्वास मा.आ.बोदकुरवार यांनी व्यक्त केला आहे. या विजयाने भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणखी बळकटी मिळाली असून, आगामी काळात विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत मिळत आहेत.
www.WaniSamachar.com









