चंद्रपूर येथील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ असे नाव; मुख्यमंत्र्यांची तत्काळ मान्यता; आ.सुधीर मुनगंटीवार यांचा प्रयत्नाला यश..

911

चंद्रपूर येथील अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय’ असे नाव; मुख्यमंत्र्यांची तत्काळ मान्यता

  • आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या आग्रही पाठपुराव्याला मुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता.

  • २८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प जनसेवेसाठी सज्ज


चंद्रपूर । दि. ०३ डिसेंबर :

चंद्रपूर जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या २८० कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालयाला आता अधिकृतपणे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालय’ असे नाव देण्यात येणार आहे.

आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही आग्रही मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ संमती दिली.

१४० खाटांचे हे अत्याधुनिक रुग्णालय टाटा ट्रस्टच्या विशेष सहकार्याने जिल्हा खनिज विकास निधीराज्य शासनाच्या मदतीने उभारण्यात आले आहे.

पूर्व विदर्भातील आदिवासी, ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरणारे केंद्र बनेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

२०१४ पासून या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीमुळे १७ एप्रिल २०१८ रोजी मंत्रिमंडळाने तर २६ जून २०१८ रोजी शासन निर्णयाद्वारे प्रकल्पाला मान्यता मिळाली. आज हा प्रकल्प पूर्णत्वास आला असून, येत्या २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य उद्घाटन सोहळा होणार आहे.

▪︎रुग्णालयाची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • बांधकाम : तळमजला + ४ मजले (१,००,००० चौ. फूटपेक्षा अधिक)
  • खाटांची संख्या : १४०
  • अत्याधुनिक उपकरणे : २ लिनिअर ॲक्सेलेटर्स (Linear Accelerators), ब्रॅकीथेरपी, मॅमोग्राफी, 3D/4D अल्ट्रासाऊंड, डिजिटल एक्स-रे
  • उपचार सुविधा : केमोथेरपी, सर्जिकल ऑन्कोलॉजी, प्रगत प्रयोगशाळा आदी

चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात गेल्या काही वर्षांत आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मेडिकल कॉलेज, १४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे, नवीन ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांची श्रेणीवृद्धी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रे असे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यातील सर्वोच्च टप्पा म्हणून हे कॅन्सर रुग्णालय पूर्व विदर्भासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

“पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे ‘अंत्योदय’ तत्त्वज्ञान गरीबांच्या उन्नतीसाठी होते. त्याच तत्त्वानुसार पूर्व विदर्भातील गरीब व आदिवासी रुग्णांना जगण्याची नवी आशा देणाऱ्या या रुग्णालयाला त्यांचेच नाव देणे उचित ठरेल,” असे मत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले आणि त्यास लगेच मान्यता मिळाली.

पूर्व विदर्भाच्या आरोग्य क्षेत्रातील हे सर्वात मोठे पाऊल मानले जात असून, या रुग्णालयामुळे कर्करोगग्रस्तांना मुंबई-पुणे किंवा नागपूरला जाण्याची गरज भविष्यात कमी होईल, असा दावा स्थानिक नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ करीत आहेत


www.WaniSamachar.com