वणी : शिवसेना(उबाठा)-मनसे युती : तब्बल २६७ उमेदवारांची मुलाखती..

1212

ठाकरे बंधुचां जोडीची वणीत पहिली पायरी: शिवसेना-मनसे युतीने २६७ उमेदवारांची मुलाखती घेतल्या, राजकीय वातावरण तापले !


वणी । १० नोव्हेंबर २०२५: :

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय असलेल्या उद्धव-राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याची नांदी आता स्थानिक पातळीवर प्रत्यक्षात उतरली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांनी हातमिळून युती जाहीर केली असून, आज दुपारी जगन्नाथ महाराज मठ, वरोरा रोड,वणी येथे तब्बल २६७ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. ही युती केवळ वणीतच नव्हे, तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी राज्यभरातील राजकारणाला नवे वळण देणारी ठरेल, अशी अपेक्षा राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे.

वणी नगरपरिषदेत एकूण ३० जागा असून, त्यापैकी एक नगराध्यक्ष आणि २९ नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक रंगणार आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह दाखवला असून, काही प्रभागांमध्ये फक्त दोन जागांसाठीच १५ ते १७ इच्छुकांनी अर्ज सादर केले. पक्ष नेतृत्वाने या स्पर्धात्मक वातावरणात उमेदवारांची कसोटी घेण्यासाठी पक्ष निरीक्षकांमार्फत सखोल मुलाखती घेतल्या. या प्रक्रियेमुळे इच्छुकांमध्ये उत्साह आणि स्पर्धा दोन्ही चरम सीमेवर पोहोचली आहे.

या महत्त्वाच्या बैठकीत शिवसेना (उबाठा) चे विद्यमान आमदार संजय देरकर आणि मनसे नेते राजू उंबरकर यांनी प्रमुख भूमिका निभावली. याशिवाय मनसे महिला सेनेच्या राज्य उपाध्यक्ष अलका टेकाम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाडे, मनसे महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा अर्चना बोदाडकर, विधानसभा संघटक सुनिल कातकडे, उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, शरद ठाकरे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, गणपत लेडांगे, रमेश पेचे, धनंजय त्रिंबके, दिलीप काकडे, फाल्गुन गोहोकार, माजी नगराध्यक्षा प्रिया लभाणे, गोविंदराव थेरे, अंकुश बोढे, अजिंक्य शेंडे, राजू तुराणकर, विलन बोदाडकर, बंडू येसेकर, विनोद ढुमने, संतोष कुचनकार, प्रकाश पिंपळकर, मनीष बत्रा, सचिन मते, राकेश वैद्य, सविता आवारी, ज्योती मेश्राम, मेघा तांबेकर, मयुर गेडाम, शंकर पिंपळकर, शम्स सिद्दिकी, राहुल पानघाटे, लक्की सोमकुंवर, अहमद रंगरेज, आशिष चतुर, अमर सातपुते, विकी कळसकर, सूरज पळसकर, राजीव पाटिल, अजय चन्ने, स्वप्नील ताजने, शत्रुघ्न मालेकर केळकर, मोरेश्वर उज्वळकर, नितिन शिरभाते, शंकर देरकर, फैजल खान, अल्ताफ शेख, मोहम्मद अन्सार या मान्यवरांची उपस्थिती होती. या युतीमुळे वणीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे.

दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी युतीच्या विजयावर ठाम विश्वास व्यक्त केला असून, “या एकत्रतेमुळे वणीवर भगवा ध्वज फडकणार आणि स्थानिक विकासाला गती मिळेल,” असे ते म्हणाले. ठाकरे बंधूंच्या पक्षांचे या स्थानिक पातळीवरील एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. वणीतील ही युती भविष्यात उद्धव-राज यांच्या मोठ्या पुनर्मिलनाची पायाभरणी ठरेल का, हे पाहणे रोमांचक ठरेल. सध्या तरी राजकीय वर्तुळात ही घटना चर्चेचा केंद्रबिंदू बनली असून, निवडणुकीची रणधर्मी आता अधिक तीव्र होईल, असे बोलले जात आहे.


www.WaniSamachar.com


■□■