हंगामी ‘समाजसेवक’ की खरे ‘जनसेवक’ ?

677

हंगामी ‘समाजसेवक’ की खरे ‘जनसेवक’? वणी नगरपरिषद निवडणुकीत मतदारांनी घ्यावी ‘ही’ काळजी..!


वणी ।  ८ नोव्हेंबर २०२५ (वणी समाचार) :

नगरपरिषद निवडणुका जवळ येताच रस्त्यावर, सोशल मीडियावर आणि होर्डिंग्जवर अचानक ‘दादा’, ‘भाऊ’, ‘तडफदार उमेदवार’ अशी नवी नवी चेहरे उगवतात. काही महिन्यांपूर्वी कुठेही दिसले नाहीत, ते अचानक गरीबांच्या झोपडीत, पाण्याच्या टाक्या जवळ, रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये फोटो काढताना दिसतात. पण हा दिखावा किती काळ टिकतो? निवडणूक संपली की हे ‘हंगामी समाजसेवक’ पुन्हा गायब होतात. यंदा वणीकरांनी अशा तात्पुरत्या नेत्यांना ओळखून खऱ्या जनसेवकांना साथ देण्याची गरज आहे.

▪︎दिखावा की सातत्य? जनतेला काय हवे?

निवडणुकीच्या तोंडावर सुरू होणारी ‘समाजसेवा’ ही मतांसाठीची गुंतवणूक असते. खरा नगरसेवक तो, जो वर्षानुवर्षे प्रभागातील प्रत्येक घराची समस्या जाणतो, शासकीय योजनांचा लाभ पोहोचवतो, रात्री-अपरात्री रुग्णालयात जातो, पाणीटंचाईत टँकर उभा करतो. जो पैशांपेक्षा माणसं कमावतो, तोच खरा नेता. अशा व्यक्तींच्या आयुष्याचा मोठा भाग जनसेवेत व्यतीत होतो. त्यांना मतदारांनी ओळखावे, हाच लोकशाहीचा खरा विजय आहे.

▪︎उमेदवारांकडून ‘या’ आश्वासनांची अपेक्षा

वणी नगरपरिषदेच्या येणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना काही ठोस आश्वासने देण्यास भाग पाडावे. प्रचारादरम्यान विचारावे:

  • पहिल्या बैठकीत करवाढ रद्द करणार? मागील पाच वर्षांत झालेल्या वाढीव करमूल्यांकनाचा बोजा नागरिकांवर पडला आहे. नवीन नगरसेवकांनी याला आव्हान द्यावे.
  • पाणी पुरवठा सुविधा योग्य व नियमित करणे? जलशुद्धीकरण केंद्र, पाइपलाइन कामांमध्ये झालेल्या चुका सुधार करून नियमित, दाबयुक्त पाणीपुरवठा कसा होईल, याचा कृतीआराखडा सादर करावा.
  • रस्ते, दिवे, स्वच्छता यांची जबाबदारी घेणार? बंद पथदिवे, खराब रस्ते, नालेसफाई, फॉगिंग – या मूलभूत सुविधा नियमित राहतील याची हमी द्यावी.
  • उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधणार? फक्त मालमत्ता करावर अवलंबून न राहता नवे स्त्रोत शोधून नगरपरिषदेची आर्थिक क्षमता वाढवावी.
  • वर्षातून एकदा जाहीर हिशोब सादर करणार? झालेल्या खर्चाचा, कामांचा पारदर्शी आढावा जनतेसमोर ठेवावा.

▪︎सुशिक्षित, सेवाभावी उमेदवाराची गरज

वणीकरांनी अंधश्रद्धा, पैशाच्या जोरावर येणाऱ्या उमेदवारांना नाकारावे. सुशिक्षित, पारदर्शी आणि सेवाभावी व्यक्तीला संधी द्यावी. जो प्रभागातील प्रत्येक वार्डाची समस्या समजून घेऊ शकेल, शासनाकडे प्रभावीपणे मांडणी करेल आणि विकासाला गती देईल, असाच उमेदवार निवडावा.

▪︎मतदार जागरूक राहिले तरच खरा बदल

निवडणुकीत फक्त होर्डिंग, जेवण, पैशांचा मोह न पाहता कामाची सातत्यता, विश्वासार्हता आणि पारदर्शकता तपासावी. ‘हंगामी समाजसेवक’ नव्हे, तर खरे जनसेवक निवडले तरच वणीचा विकास खऱ्या अर्थाने होईल. हा बदल मतदारांच्या हातात आहे.

मतदारांनो, जागे व्हा! खरे नेते निवडा!


ताज्या अपडेट्ससाठी “वणी समाचार” न्यूज पोर्टलशी जोडले जा!