✍ “दादा…आकाशा एवढा !”

421

“दादा…आकाशा एवढा !”

✍ विवेक देशपांडे


▪︎वणी । ४ फेब्रुवारी २०२६ :

आजच्या लेखाचे शीर्षक वाचून चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल की आजचा लेख कुणाबद्दल लिहिलेला असेल. अर्थातच ‘दादा’ म्हणजे ‘अजित दादा’.

स्व. दादांचा मृत्यू त्यानंतर घडलेल्या घडामोडी, सरसावलेले पवार साहेबांचे शिलेदार व मा. सुनेत्राताई यांचा उपमुख्यमंत्री म्हणून झालेला शपथविधी आपण सर्वांना ज्ञात आहेच. शपथविधीची केलेली घाई किंवा खेळी इतकी जलदगतीने खेळल्या गेली की साहेबांसकट त्यांचे शिलेदार तोंडावर आपटले. साहेब आपली ‘भाकरी फिरवणार’ वगैरे वगैरे संभावना व्यक्त करून नातवा सकट सारे शिलेदार एकामागून एक सरसावलेले होते.

२०१९ च्या लोकसभा इलेक्शनच्या अंतिम टप्प्यात बारामती येथे प्रचार थांबता थांबता झालेल्या सभेमध्ये सुप्रियाताई, दादांसह साहेब हजर होते. त्यावेळी लक्षणा सरगर नावाची एक महिला आपल्या पंतप्रधानमुख्यमंत्री यांच्याबद्दल वाटेल तशी बरळली होती. त्यावेळी साहेब सुद्धा हजर होते. “दिल्लीचा फुटाणा व मुंबईचा वटाणा” असे तिचे शब्द होते. खरे म्हणजे साहेबांनी अशा अपमानकारक भाषेसाठी तिला कडक शब्दात समज देऊन गप्प बसवावयास हवे होते; पण शेवटी ते साहेबच – सोयीचे ऐकायचे, गैरसोयीचे ऐकून न ऐकल्यासारखे करायचे हा त्यांचा खाक्या. त्या सभेत एकच व्यक्ती असा होता तो म्हणजे अजितदादा, ज्याने तिला हटकले. म्हणून त्या सभेत एकच ‘दादा’ असा निघाला की ज्याने सर्वोच्च घटनात्मक पदाचा सन्मान केला. राजकीय विचारधारा कोणतीही असो, पण देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री हे देशाचे व राज्याचे सन्माननीय उच्च पदाधिकारी असतात, त्यांचा उचित सन्मान बोलताना, वागताना ठेवलाच पाहिजे. याची जाण ठेवणारा एकटा माणूस दादा होता, त्यामुळे माझा दादा मला आकाशा एवढा वाटतो.

३ जुलै २०२३ ला दादांनी आपल्या पक्षाच्या ४० आमदारांना सोबत घेऊन महायुती सरकार मध्ये प्रवेश करून आपल्या पक्षाच्या इतर आठ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर मुंबईच्या पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेत दादांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, “एनडीए सोबत आमच्या अनेक बैठका यापूर्वी झाल्या होत्या, त्यातील काही बैठका इंदोर, अहमदाबाद, दिल्ली येथे झाल्या होत्या आणि त्या पवारांच्या संमतीनेच झाल्या होत्या व भाजपप्रणीत सरकारमध्ये सामील व्हायचे ठरले होते. पण प्रत्येक वेळी पवारसाहेब ‘सध्याच नको’ असे म्हणून चर्चा थांबवत होते.” यात अजितदादांनी त्या सभेमध्ये असेही सांगितले होते की, वरील सर्व चर्चा ह्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यापूर्वीच्या होत्या. याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की, राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना घेऊन मी जर सरकारमध्ये गेलो असतो तर एकनाथ शिंदे ऐवजी मी मुख्यमंत्री झालो असतो आणि पवार साहेबांना हेच नको होते.

आपल्या मुलीच्या करिअर साठी एका लायक माणसाला सतत मागे ठेवण्याचे काम साहेबांनी केले. आता साहेबांसकट त्यांचे सारे शिलेदार व काही स्वनामधन्य पत्रकार “दोन्ही पक्षांनी एकत्र येणे ही दादांची अंतिम इच्छा होती” असे सांगून राहिले. त्यांना म्हणावेसे वाटते की, मग दादा हयात असताना त्यांची प्रथम इच्छा का पूर्ण केली नाही? मृत्यूनंतर अंतिम इच्छा सांगता, तर अंतिम इच्छेला मृत्यूनंतर केलेल्या विधीमध्ये पिंडाला कावळे शिवतात, मग तुम्हाला काय म्हणायचे?
केवळ दादांना पुढे जाऊ न देण्यासाठी त्यांची सतत अवहेलना केली. सत्तेत बसवले, त्यांचा हवा तसा वापर करून घेतला पण मोठे होऊ दिले नाही, याला काय म्हणायचे?मी दादांचा समर्थक वगैरे कधीच नव्हतो. त्यांची माझी विचारधाराही कधी जुळली नाही. पण त्यांचा स्पष्टवक्तेपणा, कामाची तडफ, प्रशासनावरील त्यांची पकड, सडेतोड बोलणं, एखाद्या प्रकल्पाचे अभ्यासपूर्ण आकडेवारीसह विवेचन याचा मी चाहता होतो. ‘देवाभाऊंशी’ (देवेंद्र फडणवीस) त्यांचे छान ट्युनिंग जमले होते आणि ही जोडी महाराष्ट्राला निश्चित पुढे नेईल असे वाटायला लागले होते. नेमके त्याचवेळी हा हिरा काळाने आपल्यापासून हिरावून नेला याचे फार दुःख वाटते.

शेवटी पुन्हा म्हणेन, “माझा दादा … आकाशा एवढा !”

✍ विवेक देशपांडे, वणी
📱 ९४२२८६९५०३


उपरोक्त लेखात मांडलेले विचार, हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. या लेखाशी WaniSamachar.com सहमत असेलच असे नाही.


आपले लेख, बातमी व जाहिरात प्रसिद्ध करण्या करीता संपर्क करा, 9021203010.


www.WaniSamachar.com