“एका तडफदार नेत्याची अकाली एक्झिट”
▪︎वणी । २९ जानेवारी २०२६ :

आज सकाळी एका हादरवून टाकणाऱ्या बातमीने मन सुन्न झाले. बातमी अशी की, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. क्षणभर विश्वासच बसला नाही; पण विविध न्यूज चॅनेलवरील अपघाताच्या फुटेजमुळे बातमीची सत्यता लक्षात आली. मुंबईवरून बारामती येथे जात असताना बारामती विमानतळाजवळ हा अपघात घडला. दाट धुक्यामुळे कमी दृश्यमानता असल्यामुळे आणि विमानतळावर ILS (Instrument Landing System) नसल्यामुळे वैमानिकाला धावपट्टीचे नीट आकलन झाले नाही व हा अपघात घडला, असा विविध न्यूज चॅनेलवर अंदाज व्यक्त होत आहे. सखोल चौकशीनंतर अपघाताचे नेमके कारण कळेलच. चौकशीचे आदेश DGCA ने दिल्याचेही कळते आहे.

अजितदादा पवार हे मा.शरद पवार साहेब यांचे पुतणे. सहकार क्षेत्रापासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. बारामती लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतानाच पोटनिवडणुकीद्वारे बारामती विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार बनले. त्यानंतर आजपर्यंत ते बारामतीचे आमदार राहिले. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि उपमुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास होता. या राजकीय प्रवासात अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी अकरा वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आताही ते उपमुख्यमंत्री पदाबरोबरच अर्थमंत्रीही होते; पण या वर्षीचा अर्थसंकल्प त्यांनी मांडणे हे नियतीला मंजूर नव्हते.

अजितदादांच्या राजकारणावर मा.यशवंतराव चव्हाणांची छाप होती. त्यांचे काका शरद पवार साहेब यांचे राजकीय गुरू म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. शरद पवार साहेबांच्या छत्रछायेखाली अजितदादांचे राजकीय जीवन बहरले. खरं म्हणजे मोठ्या झाडाच्या छायेखाली छोटे झाड बहरते; पण त्याचे अस्तित्व मोठ्या झाडावरच अवलंबून असते. पण अजितदादा याला अपवादच ठरले, असे म्हणावे लागेल. त्यांनी पवार साहेबांच्या वारशावर अवलंबून न राहता आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण केली. त्यांची कार्यकर्ते जोडण्याची पद्धत, कामाची तडफ, त्यांचा प्रशासनावर असलेला वचक आणि योजनेचा सखोल अभ्यास राज्याच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवून गेला. आणि त्यामुळेच त्यांच्या पक्षात दिग्गज नेत्यांची फौज असतानाही कुणा नेत्याने अजितदादांना आव्हान दिले नाही.

अतिशय स्पष्टवक्तेपणा हा त्यांचा आणखी एक मोठा गुण होता. सभेच्या भाषणादरम्यान, “ए, चूप बस रे! मला बोलू दे” असे म्हणणारे दादा अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून येतील, हा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. म्हणूनच कार्यकर्त्यांवर त्यांचा वचक होता. भल्या पहाटेपासून कामाची सुरुवात करणारा एकमेव नेता असेच वर्णन पुढील काळातही त्यांचे होईल.
मा.प्रमोदजी महाजन, विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथजी मुंडे, आर. आर. पाटील साहेब आणि आता अजितदादा यांचे अकाली जाणे म्हणजे राज्याची फार मोठी हानी आहे. आपले राजकीय जीवन घडवण्यासाठी राजकीय कार्यकर्त्याला बरेच परिश्रम करावे लागतात. त्यासाठी बराच कालावधीही लागतो आणि अशा अकाली जाण्याने राज्याची अपरिमित हानी होते. मला तर आता असे वाटायला लागले आहे की, महाराष्ट्राला शाप तर नाही ना? ज्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्राचा विकास होऊ लागला रे लागला की नियती आपला डाव साधते. ही सर्व मंडळी भलेही वेगवेगळ्या पक्षांची असतील; पण राज्याच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.

दादांच्या जाण्याने त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांची अपरिमित हानी झाली आहे. धाय मोकलून रडणारे कार्यकर्ते व नेते आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचीही प्रतिक्रिया त्यातलीच. पत्रकारांशी बोलताना फडणवीस फक्त रडायचे बाकी राहिले होते. एक दमदार, दिलदार मनाचा मित्र गमावल्याची खंत त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. याच प्रसंगी मला हिंदू हृदयसम्राट वं. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या पत्नी मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या निधनानंतर दिलेली प्रतिक्रिया आठवते. त्यावेळी वं. बाळासाहेब म्हणाले होते, “राजाला रडताही येत नाही आणि मासा पाण्यात रडला तर कुणाला दिसतही नाही.” आज तशीच अवस्था मा.देवेंद्रजींची झालेली मला दिसली.
दादा, आपण गेलात आम्हाला पोरके करून. जेव्हा जेव्हा राज्यावर कुठले संकट येईल, तेव्हा तेव्हा तुमची आठवण येत राहील. तुमचा स्पष्टवक्तेपणा, कामाची तडफ, कार्याचा सखोल अभ्यास, तुमची करडी नजर, शिस्त आणि तेवढाच दयाळूपणा आमच्या कायम लक्षात राहील.
दादांच्या कुटुंबीयांना, कार्यकर्त्यांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देवो. मा. अजितदादांच्या आत्म्यास शांती मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. शेवटी एवढेच म्हणेन, “दादा, हो सके तो लौटके आना !”
भावपूर्ण श्रद्धांजली !
✍ विवेक देशपांडे, वणी
📱 9422869503.

आपले लेख, बातमी व जाहिरात प्रसिद्ध करण्या करीता संपर्क करा, 9021203010.
www.WaniSamachar.com




