✍ लेख : “मनपा निकालांचा अन्वयार्थ”

531

“मनपा निकालांचा अन्वयार्थ”


वणी । १७ जानेवारी, २०२६ :

लेखांच्या प्रवासातला हा सहावा लेख. लेखनाचा प्रवास सुरु करताना पाच लेखान नंतरच सकारात्मक प्रतिक्रिया आल्यावरच लेखन सुरु ठेवावे असे ठरवले होते, तश्या प्रतिक्रिया मिळाल्यात त्यामुळे हा प्रपंच सुरु ठेवावे असे वाटते. बहुतांश प्रतिक्रिया हुरूप वाढविणाऱ्या आहेत. काही सहृदयीनी ‘नाके मुरडली’ तर काहींनी ‘आम्हाला वाटलंच तुम्हीच असाल ते’, अशा लोकांकडे दुर्लक्ष करुन हुरूप वाढविणाऱ्यांचे आभार मानून हा प्रपंच सुरु ठेवावा असे वाटते.

आज तसा विषयही मिळाला त्यामुळे व्यक्त होतो आहे. लेखानमधून व्यक्त केलेली मते ही सर्वांना आवडेलच असे नाही किंवा तसा आग्रहही नाही, पण संयत प्रतिक्रियांचा सन्मानच असेल. कुठे दिलेले संदर्भ चुकीचे वाटले तर तशा सूचना स्वागतार्ह असतील. त्यासाठी लेखाखाली दिलेल्या व्हाट्सऍप्प नंबरवर सूचना दिल्यास ज्ञानात भर पडेल.आता आपल्या विषयावर येऊया. काल घोषित झालेल्या मनपा निकालांवरून असे दिसते की एकूण 29 मनपा पैकी सुमारे 25 मनपा मधे महायुती व यातील 15 मनपा मधे निर्भेळ भाजपाची सत्ता येते आहे. आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाला एवढे निर्भेळ यश मिळवता आलेले नाही त्यामुळे भाजपा मित्रपक्षाचे यश लक्षणीय ठरते.

सर्वप्रथम आपण या निवडणुकी पूर्वीची परिस्थिती समजून घेऊया. निवडणूक कार्यक्रम घोषित होताच सर्व पक्ष कामाला लागलेत यामध्ये भाजपा हा आधीपासूनच कामाला लागला होता कारण तो 24/7 इलेक्शन मोडवरच असतो. जवळपास सर्वच मनपाच्या निवडणुका ह्या तीन-चार वर्षांनंतरच होत होत्या. मुंबईची तर आठ वर्षांनंन्तर निवडणूक झाली त्यामुळे विविध पक्षांची कार्यकर्ता मंडळी निवडणुक लढवण्यास सज्ज होती व ते स्वाभाविकही होते त्यामुळे कुठे युती-आघाडी दिसली तर कुठे मैत्रीपूर्ण लढती दिसल्या. या लढतीमधील माझी निरीक्षणे खालीलप्रमाणे आहेत.

  1. प्रत्येक मनपा क्षेत्राची परिस्थिती पाहून निर्णय घेतला गेला.
  2. भाजपने आपली शक्ती ओळखुन एकटं लढायचं की युती करुन हे प्रथम निश्चित केलं.
  3. मतदानाचे विभाजन आपल्या पथ्यावर कसे पडेल याचा सर्वंकश विचार केला.
  4. सारी सूत्रे एकाच नेत्याच्या हातात न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नेतृत्व तयार केले व त्यांच्यावर विश्वास दाखवला गेला.
  5. रोजच्या प्रचारावर उच्च स्तरावरून नियंत्रण ठेवले व उपयुक्त सूचनांसह लुप-होल शोधून उपायही सुचवले व कार्यकर्त्यांकडून आमलात आणून घेतले.
  6. पक्षाच्या नेत्यांच्या सभा, बैठकांची व्यवस्थित रचना लावली.
  7. देवेंद्रजींसह इतर नेत्याने शहर विकासाव्यतिरिक्त नकारात्मक विषयावर बोलणे टाळले.
  8. विकासावर बोलताना आधी केलेली कामे व पुढे करणार असलेली कामे याची तपशीलवार मांडणी केली.
  9. भावनिक मुद्दे न आणता विकास केंद्रित प्रचार केला गेला.
  10. सर्वात महत्वाचे म्हणजे विरोधकांना त्यांच्या आपशी भांडणात व्यस्त ठेऊन प्रचाराचे काटेकोर नियोजन भाजपने केले.
  11. कुठल्याही पक्षाची वोट बँक असते, यावेळी भाजपाची ही वोट बँक कामाला लागल्याचे दिसले.
  12. विविध प्रभागात असलेली अमराठी मते जी गेमचेंजर ठरू शकतात ती आपल्या पारड्यात कशी पडतील याची काळजी घेतल्या गेली.

या उलट विरोधी पक्षाची काय स्थिती होती, तर केवळ भावनिक मुद्दे काढून प्रचार केला गेला. बहुतांश ठिकाणी स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष केल्या गेले. शिवसेना, मनसे यांनी केवळ मुंबई कडे जास्त लक्ष केंद्रित केल्यामुळे यांचा प्राण मुंबईत अडकला आहे या भाजपने केलेल्या प्रचाराचा प्रभाव मतदारांवर पडला. बंडखोरी केलेल्या बहुतेक उमेदवारांना देवेंद्रजींनी स्वतः बोलून माघार घ्यायला लावली. प्रचारात स्वतः सह पक्षाला झोकून दिले. कुठेही तोल जाऊ न देता फक्त विकासावर निवडणूक लढवली. विरोधकांनी त्यांचा ‘बाप काढला’ तरी या माणसाने आपला तोल जाऊ दिला नाही. तिथेच हा माणूस अर्धे इलेक्शन जिंकला.

राजकीय पक्षामध्ये तीन पायऱ्या असतात. कार्यकर्ता, पदाधिकारी व नेता. देवेंद्रजींनी या तीनही पायऱ्या पार केल्या आहेत. यात आणखी एक पायरी असते ती म्हणजे ‘जननेता’ किंवा ‘लोकनेता’. ही पायरी पक्षातीत नसते, तर ती लोकांकडून मिळत असते. ‘देवाभाऊ‘ या पायरीकडे झपाट्याने चालले आहेत.

निकालानंतर या माणसानी काय करावे तर सर्वप्रथम आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाना फोन करुन त्यांचे अभिनंदन केले व प्रत्येक मनपाच्या भाजपा प्रभारीना फोन करुन त्यांचेही अभिनंदन केले व हे यश तुमच्या प्रयत्नांनी मिळाले, असे म्हणत यशाचे सारे श्रेय त्यानां दिले. केवढी ही निःस्पृहता ! देवाभाऊ तुसी ग्रेट हो यार !

निकालानंतर मला दोन गोष्टी मनाला भावल्या. कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन हा माणूस जेव्हा घरी आला तेव्हा त्यांची कन्या चि. दिविजा हिने बाबा म्हणून आवाज देऊन मारलेली मीठी.
दिग्विजयी बापाची इवलीशी पोर ती. मीठी मारताना देवेंद्रजी ना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, ना भाजपचे नेते होते, ते होते फक्त दिविजाचे लाडके बाबा.

देवेंद्रजींचे विजयाचे शिलेदार आशिषजी शेलार, प्रसादजी लाड आणि इतर त्यावेळी उपस्थित होते ते सुद्धा हा कौतुक सोहळा पाहून गदगद झालेले मला दिसले. मुलीकडून औक्षण करुन घेताना काय विचार असतील त्यांच्या मनात? कृतकृत्यत्येचेच असतील नाही कां? देवाभाऊ त्यांच्या जबाबदारी मूळे व कामाच्या व्यापामुळे मुलीला वेळ देऊ शकत नसतील कारण नेत्याला वैयक्तिक आयुष्य जवळपास नसतेच. अनेकदा देवेंद्रजी घरी येतपर्यंत ही पोर झोपूनही जात असेल. तिला बाबांशी काही बोलायचे असले तेही शक्य होत नसेल पण आज ती पोर बाबांची चातकासारखी वाट बघत होती आणि बाबा दिसल्यावर तीने कडाडून मीठी मारली अत्यन्त भावस्पर्शी प्रसंग.

दुसरा प्रसंग तिथून नागपूरला आल्या नन्तरचा. कार्यकर्त्यांचे अभिनंदन करुन देवाभाऊ बावनकुळें सोबत नितीनजींच्या घरी गेले. त्यांना व कांचन वहिनींना नमस्कार केला. काय अर्थ काढावा मित्रांनो याचा? अर्थ एकच त्यांनी हा विजय नितीनजींना अर्पण केला. याला म्हणतात संस्कार. हा असतो आदर्श येणाऱ्या पिढीकडे ठेवण्याचा. ज्यांनी राजकारणात मोठे केले, जे सावलीसारखे पाठीराखे असतात त्यांना विसरून कसे चालेल याला म्हणतात आदर्श घालणे. विजयातही हा माणूस अविचल राहतो. यशाचे श्रेय इतरांना देतो त्याला म्हणतात नेता. त्रिवार वन्दन देवाभाऊ तुम्हाला. ना कुठला माज ना कुठला अहंकार. ग्रेटच !

या निकालांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भाजपचे मित्रपक्ष भाजपच्या मदतीशिवाय पनपू शकत नाही. पुढील वाटचालीत त्यांना भाजपला सोबत घ्यावेच लागेल. शरद पवारांचाही करिष्मा संपला आहे. शिवसेना (उबाठा) स॔पलेली नाही. देवेंद्रजींनीही प्रचारात तसे म्हटलेही नाही. पण त्यांना पुढील काळात खूप मेहनत घ्यावी लागेल. विरोधी बाकावर बसून प्रहरी म्हणून काम करावे लागेल. नगरसेवकही सांभाळावे लागतील, उगीच विरोधासाठी विरोध न करता विकासाच्या कामात सत्ताधाऱ्यांसोबत रहावे लागेल.

बहुतांश मनपामध्ये भाजपा कां जिंकला याचे एक उदाहरण सांगणे मला यावेळी योग्य वाटते.
नागपूरला माझे एक नातेवाईक राहतात. ते व्यवसायाने वकील आहेत. दैनंदिन कामात त्यांची व्यस्तता असते. इलेक्शनच्या दिवशी त्यांनी इतर कोणतेही काम न करता दिवसभर एक बूथ सांभाळले. ते स्वतः त्यांचे बंधू, मित्र तसेच काही उच्च शिक्षित महिलाही त्यांचेसोबत होत्या.
यानी काय झाले असेल तर त्या बूथचे पक्षाचे इतर कार्यकर्ते फ्री झाले असतील त्यांनी मग त्यांचा वेळ आपल्या की-वोटर्सना मतदानासाठी प्रवृत्त केले असेल. त्यामुळे पर्यायाने भाजपच्या मतदानात वाढ झाली व त्याचा भाजपला फायदा झाला. कोण असतात ही निःस्पृह लोक, तर हे एक राष्ट्रकार्य म्हणून स्वतःला खपवून घेतात व दुसऱ्या दिवशीपासून आपल्या पोटापाण्याच्या धंद्याला लागतात. कुठला वशीला लावून ‘स्वीकृत सदस्य’ म्हणून नेमणूक होण्यासाठी धडपडतही नाही.

भाजपजवळ अशा निःस्पृह नागरिकांची फौज आहे, म्हणून भाजप जिंकतो. देवेंद्रजींना याची जाण आहे इतर ठिकाणच्या भाजपवाल्यांनीही याची जाण ठेवावी. दुसरी भाजप कार्यकर्त्यांच्या प्रचाराची. याच नातेवाईकांच्या सोसायटी मधे प्रचारासाठी भाजपा कार्यकर्ते चार वेळा आलेत. पहिले मतदारांच्या भेटीला. दुसऱ्यांदा येऊन चार मशीनवर वोटिंग कसे करायचे याचा डेमो देऊन गेले. तिसऱ्या वेळी मतदारांना वोटिंग स्लीप्स दिल्यात. व चौथ्यांदा प्रत्येक फ्लॅटवर जाऊन कोणी इतर प्रभागाचे मतदार आहेत कां याची चौकशी करून त्यांना त्यांचे मतदान कक्ष व वोटिंग स्लिप आणून दिली व मतदान केंद्र शोधण्यासाठी अथवा कक्ष शोधण्यासाठी काही अडचण आल्यास तेथील कार्यकर्त्यांचा मोबाईल नंबरही दिला. आता मला सांगा एवढे केल्यावर तो मतदार मतदान भाजपला सोडून दुसर्‍याला करेल काय. मग वोट चोरी, वोटिंग मशीन सेटिंग व शाई पुसली अशा रुदाल्या करुन काय उपयोग.

यात सर्वात धक्कादायक निकाल चंद्रपूरचा लागला त्याची काही कारणेही आहेत. अँटीइनक॔बन्सी आणि पक्षातील प्रमुख नेत्यांमधील दुरावा, वेळेवर उमेदवारांची यादी बदलल्याचा प्रचंड घोळ व राडा आदिमुळे पक्ष तिथे माघारला. तसे पहिले तर काँग्रेस मधेही प्रमुख नेत्यांमधे प्रचंड दुरावा होता पण तरीही या पक्षाने सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले त्यासाठी मा.खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. खासदार झाल्यांनतर त्यांनी पहिले नगर पालिका व आता मनपा यात पक्षाला विजयी केले यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भाजपासाठी मात्र ही धोक्याची घन्टा आहे. पक्षश्रेष्ठिनी वेळीच दखल घेतली नाही तर 2029 मधे चंद्रपूरचा खासदार भाजपचा होणे नाही. आमचे खाडे सर नेहमी म्हणतात, ” तुम्ही जेव्हा एक असता तेव्हा तूम्ही विजयी होता आणि तुम्ही जेव्हा विखूरलेले असता तेव्हा तुमचा पराभव अटळ असतो “. ऐका रे बाबांनो त्यांचे. सत्तर वर्षाचे असून सुद्धा कुठलीही अपेक्षा न करता तो तुमच्यासाठी झटतो. त्यांची तरी किंमत करायला शिका.

शेवटी पुन्हा एकदा देवाभाऊ व टीमचे अभिनंदन. मतदारांनी भावना नव्हे तर कामगिरी, पर्याय आणि व्यवहार्यतेला प्राधान्य दिले. त्याने निर्णय क्षमतेला पाहून मतदान केले. तसेच महाराष्ट्राचे राजकारण एका कुटुंबाभोवती फिरत नसून नेतृत्व व कर्तृत्व निवडणुकीतून ठरते असा स्पष्ट संदेश दिला.

या निकालाचा सर्वात मोठा अन्वयार्थ हा की, मतदाराचा स्वभाव बदललेला आहे. तो आता कोणाच्या नावावर, आडनावावर मतदान करत नाही. तर शहरातील रस्ते, पाणी, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार त्याच्यासाठी अधिक महत्वाचे ठरतात.

विवेक देशपांडे, वणी

📱 9422869503.


www.WaniSamachar.com