महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा; १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल !

852

महाराष्ट्रात महापालिका निवडणूकांचा महासंग्राम

▪︎१५ जानेवारीला मतदान,

▪︎१६ जानेवारीला निकाल.


मुंबई । दि.१५ डिसेंबर २०२५ :

राज्य निवडणूक आयोगाने आज महत्त्वाच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. यात बृहन्मुंबई (बीएमसी), ठाणे, पुणे, नागपूर, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कुपवाड, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), नांदेड-वाघाळा, लातूर, परभणी, जालना, इचलकरंजी, चंद्रपूर, धुळे, जळगाव, मालेगाव, भिवंडी-निजामपूर आणि पनवेल या महापालिकांचा समावेश आहे. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांच्या निवडणुका प्रथमच होणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होईल, तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

आजपासूनच (१५ डिसेंबर २०२५) संबंधित क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

▪︎निवडणूक कार्यक्रम :

  • नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची मुदत : २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
  • अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर २०२५
  • उमेदवारी माघार घेण्याची शेवटची तारीख : २ जानेवारी २०२६
  • चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी : ३ जानेवारी २०२६
  • मतदान : १५ जानेवारी २०२६
  • मतमोजणी व निकाल : १६ जानेवारी २०२६

या निवडणुकांसाठी एकूण सुमारे ३.४८ कोटी मतदार आहेत. मतदान ईव्हीएमद्वारे होईल आणि उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.

मुंबई महापालिकेत एकसदस्यीय प्रभाग पद्धती, तर उर्वरित २८ महापालिकांमध्ये बहुसदस्यीय (१ ते ५ सदस्य) प्रभाग पद्धती लागू आहे. एकूण २,८६९ जागांसाठी लढत होणार असून, यात महिलांसाठी ५० टक्के आरक्षण आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रलंबित असलेल्या या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर आता मार्गी लागल्या आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, “मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.”

या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर या महापालिकांमध्ये प्रमुख पक्षांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे.


www.WaniSamachar.com