》काँग्रेसला सलग धक्के ! शहराध्यक्षा शामाताई तोटावार व सेवादल अध्यक्ष प्रमोद लोणारे यांचा राजीनामा; अंतर्गत वादाची ठिणगी…

1314

 ◇ वणी न.प. निवडणूक २०२५ ◇ 

काँग्रेसला सलग धक्के ! शहराध्यक्षा ‘शामाताई तोटावार’ व सेवादल अध्यक्ष ‘प्रमोद लोणारे’ यांचा राजीनामा; अंतर्गत वादाची ठिणगी..


वणी | १९ नोव्हेंबर २०२५ :

ऐन वणी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे! शहर महिला शाखेच्या अध्यक्षा शामाताई सतिष तोटावार आणि शहर सेवादलाचे अध्यक्ष प्रमोद गोकुल लोणारे यांनी आज राजीनामा दिला. दोघांनीही राजीनामा पत्रात आरोग्य व कौटुंबिक कारणे नमूद केली असली तरी, पक्षातील अंतर्गत वाद, उमेदवारी वाटपातील अन्याय आणि महाविकास आघाडीमुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हिरमोड ही मुख्य कारणे असल्याची चर्चा शहरात जोरात आहे. या राजीनाम्यामुळे काँग्रेसचे ‘देऊळ पाण्यात’ गेल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांमध्ये पसरली असून, निवडणुकीतील समीकरणे पूर्णपणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजीनाम्यांचे पार्श्वभूमी: निष्ठावंतांना डावलले?

शामाताई तोटावार (स्व. सतिषबाबू तोटावार यांची पत्नी व स्व. मदन अण्णाजी पुनियाला यांची मुलगी) या वणी काँग्रेसच्या दीर्घकालीन कार्यकर्त्या आहेत. स्व. सतिषबाबू तोटावार यांनीच शहर काँग्रेसला मजबूत केले असून, शामाताईंनीही महिला शाखेच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्ये केली आहेत. त्यांच्या राजीनामा पत्रात आरोग्य समस्या व कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्याचे सांगितले, पण सूत्रांच्या माहितीनुसार, नगरपरिषद निवडणुकीत पक्षातील निष्ठावंतांना डावलून बाहेरील आयातीत नेत्यांना तिकीट देण्यावरून त्यांची नाराजी वाढली होती. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्याला उमेदवारी नाकारल्याने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

दुसरीकडे, प्रमोद लोणारे हे २००६ पासून काँग्रेसमध्ये सक्रिय असून, २०१९ पासून शहर सेवादलाचे अध्यक्ष आहेत. ते वणी पालिकेचे माजी नगरसेवक, आरोग्य सभापती, पहाड समाजाचे अध्यक्ष आणि जगदंबा देवस्थानाचे सचिवही आहेत. त्यांच्या राजीनामा पत्रातही कौटुंबिक कारणे नमूद केली, पण पक्षातील जागावाटपात स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेणे व महाविकास आघाडीतील आघाडीमुळे इच्छुकांना संधी न मिळाल्याने नाराजी निर्माण झाली असल्याचे समजते. काही कार्यकर्त्यांनी दुसऱ्या पक्षात जाऊन उमेदवारी मिळवली असून, लोणारे यांचा निर्णयही त्याच वादातून घेतल्याची चर्चा आहे.

▪︎पक्षातील असंतोष: ‘आयाराम-गयाराम’चा खेळ?

नामांकन प्रक्रिया संपलेल्या दुसऱ्याच दिवशी हे राजीनामे काँग्रेससाठी मनस्तापाची बाब ठरले आहेत. पक्षातील वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी वाटपावरून घमासान उडाले असून, महाविकास आघाडीमुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे सांगितले जाते. “निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला करून बाहेरील नेत्यांना प्राधान्य दिल्याने पक्षाची एकजूट धोक्यात आहे,” असे एका पक्ष नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. यामुळे काँग्रेसचे जनाधारावर परिणाम होण्याची शक्यता आहे, तर विरोधी पक्ष – भाजप व शिवसेना गट – यांना फायदा होऊ शकतो.

▪︎वणीकरांची प्रतिक्रिया: ‘काँग्रेसमध्ये काय चालले?’

  • शामाताई व प्रमोदभाऊंच्या जाण्याने महिला व युवा शाखा कमकुवत होईल. पक्षाने आत्मपरीक्षण करावे,” असे एका जुन्या कार्यकर्त्याने सांगितले.
  • निवडणुकीपूर्वीच अंतर्गत कलह – हा काँग्रेसचा स्वतःचा शत्रू आहे,” असे स्थानिक राजकीय निरीक्षक म्हणाले.

▪︎पुढील चित्र: माघार व प्रचारात काय होईल?

माघार घेण्याची मुदत (१९ ते २१ नोव्हेंबर) सुरू असताना हे राजीनामे काँग्रेसला आणखी बॅकफूटवर ढकलतील. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या मतदानात पक्ष कसा उभारी घेईल, हे पहावे लागेल. काँग्रेस नेत्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, पण पक्षातील सूत्रांनी सांगितले की, नवीन नेतृत्व नेमण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.


वणीकरांनो, काँग्रेसच्या या संकटाला तुम्ही काय म्हणाल? निवडणुकीत हा धक्का किती मोठा ठरेल? कमेंट करा! WhatsApp: ९०२१२०३०१० वर मते पाठवा.

अपडेट्ससाठी आमचे पोर्टल ला भेट द्या!


www.WaniSamachar.com


■□■